|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अमंलबजावणी करु

‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अमंलबजावणी करु 

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर : अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांची गंभीर दखल

प्रतिनिधी/ सांगली

राज्यातील काही आश्रमशाळामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. राज्य महिला आयोगाने या घटनांची वेळोवेळी गंभीर दखल घेतली आहे. समाजामध्ये असलेल्या अशा विकृत मनोवृत्तीला चाप लावण्यासाठी बाल लैंगिकअत्याचार प्रतिबंधक कायद्याची (पोक्सो) प्रभावी अमंलबजावणी करु, अशी ग्वाही आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, भाजप नेत्या नीताताई केळकर उपस्थित होते.

राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाकरिता राज्यभरात ‘प्रज्ज्वला’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या शुभारंभाकरिता रहाटकर जिल्हा दौरा आहेत. राज्यातील आश्रमशाळा मधील गैरप्रकार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱया अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, या घटना लाजिरवाण्या आहेत. ज्या उद्देशाने आश्रमशाळा स्थापन करण्यात आला, त्या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना राज्य महिला आयोग गंभीरपणे घेते. वेळोवेळी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अत्याचाराच्या घटनांना चाप लावण्यासाठी यापुढच्या काळात पोक्सो कायदा अधिक कडक करण्यात येईल.

ते प्रकरण न्यायप्रविष्ठ

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे दाखल करत संशयित आरोपींना अटकही केली आहे. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. गर्भलिंग निदानाच्या घटना उघडकीस येत असल्याचे सांगत पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी लवकरच राज्यभरात दौरे करणार असल्याचेही रहाटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सक्षमीकरणासाठी प्रज्ज्वला योजना

रहाटकर म्हणाल्या, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला आयोगाच्या पुढाकाराने राज्यभरात ‘प्रज्ज्वला’ योजना राबविण्यात येत आहे. अनेक महिलांना त्यांच्यासाठी असणारे कायदे, योजना माहित नाहीत. त्याबबत या योजनेच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यात तीन टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बचत गटातील महिलांना बळ देणे, त्यांच्यातील उत्पादकता जागृत करणे यासह त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट मिळवून देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एक जिल्हा, एक प्रोडक्ट’ अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. 

चित्ररथाच्या माध्यमातून जागृती

महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुणे ते पंढरपूर अशी ‘वारी नारीशक्तीची’ चित्ररथ यात्रा सुरु आहे. तुकोबाराय व माऊलींच्या पालखीबरोबर हे दोन चित्ररथ मार्गक्रमण करत आहेत. त्यामध्ये महिलांच्या विषयीचे कायदे, योजनांची माहिती आहे. सक्षमीकरणाबाबतचे चित्रपट तसेच भारुडांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जागृती करण्यात येत आहे. सॅनिटरी नॅपकिन बाबत संदेश देण्यात येत आहे.