|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ट्रकचालकांना लुटणाऱया सहा चोरटय़ांना अटक

ट्रकचालकांना लुटणाऱया सहा चोरटय़ांना अटक 

प्रतिनिधी/ सांगली

मिरज-अंकली रस्त्यावर ट्रकचालकांना कोयत्याने मारहाण करुन लुटणाऱया सहा सराईत चोरटय़ांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख 34 हजार 700 रुपयांसह बारा मोबाईल, तीन धारदार कोयते असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असून या टोळीवर ‘मोक्का’ नुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

शाहरुख रुस्तम नदाफ (19, रा. पोळमळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली), सोहेल उर्फ टोल्या गफूर तांबोळी (20 हनुमाननगर, सांगला, सध्या रा. आंबेडकर नगर, सोलापूर), राजा उफ राजू नागेश कोळी (19, रा. काळीवाट, हरिपूर रोड, सांगली), संतोष उर्फ ऋतीक शंकर चक्रनारायण (19, रा. माणिक पेठ, अक्कलकोट, जि. सोलापूर) व अजय उर्फ वासुदेव भोपाल सोनावणे (वय 20 रा. विठ्ठलनगर, शंभरफटी रस्ता, सांगली) व एक अल्पवयीन अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरटय़ांची नावे आहेत. त्यांच्याकडून सात जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

मागील दोन दिवसात मिरज-अंकली, सांगली-मिरज व सांगली-कोल्हापूर रस्त्यावर ट्रकचालकांना कोयत्याने मारहाण करुन रोख 40 हजार रुपयांसह मोबाईल चोरटय़ांनी लंपास केले होते. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांच्यासमोर या चोरटय़ांना पकडण्याचे आव्हाण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांनी या घटनांची गांभीर्याने नोंद घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. दरम्यान स्थनिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक अंकली चौकात गस्त घालत असताना अंकली रस्त्यावर रेल्वेच्या जुन्या बंद गेट शेजारी सहाजण दरोडा घालण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने त्याठिकाणी जात एका उसाच्या शेताजवळ सहा जणांना छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मिरज-अंकली, सांगली-मिरज, मिरजेतील वंटमुरे कॉर्नर व सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली फाटा येथे ट्रक चालकांनासहीत अन्य जणांना लुटल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख 34 हजार 700 रुपये, वेगवेगळ्या कंपनीचे बारा मोबाईल आणि तीन धारदार कोयते असा 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले सर्व संशयित सराईत चोरटे आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गर्दी, मारामारी आर्म ऍक्टसाखरे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे सांगत चोरीच्या दुचाकीवरुन मध्यरात्री ट्रकचालकासह अन्य वाहनधारकांना ते लुटत होते, असे शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी पोलिस उपअधिक्षक अशाक वीरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.

टोळीला मोक्का लागणार

अटक करण्यात आलेले सहाजण सराईत चोरटे आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे. शाहरुख नदाफवर सहा, राजा उर्फ राजू कोळीवर तब्बल 11, सोहेल तांबोळीवर दोन तर अजय उर्फ वासुदेव सोनावणे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात तीन गुह्यांची नोंद आहे. त्यांनी वेळोवेळी आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सहाजणांच्या टोळीला लवकरच ‘मोक्का’ लावण्यात येईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

सांगली-सोलापूर कनेक्शन

ट्रकचालकांना मारहाण करुन लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सांगली व सोलापूर जिह्यातील चोरटय़ांचा समावेश आहे. या दोन्ही जिह्यातील गुन्हेगार एकमेकांशी समन्वय साधून गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शाहरुख नदाफ याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांनतरही त्याने जबरी चोरीत सहभाग घेतल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे. त्यामुळे यापुढे अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचे शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले.