|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दीड कोटींच्या अवैध माती उत्खननप्रकरणी दोन मंडल अधिकारी, तलाठी निलंबित

दीड कोटींच्या अवैध माती उत्खननप्रकरणी दोन मंडल अधिकारी, तलाठी निलंबित 

जिल्हाधिकाऱयांची कारवाई : महसूल विभागात खळबळ

प्रतिनिधी/ मिरज

तालुक्यातील म्हैसाळ गावच्या हद्दीत संगनमताने गेली वर्षभर अवैधरित्या दीड कोटी रूपयांच्या माती उत्खननप्रकरणी कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन मंडल अधिकारी आणि एका तलाठय़ाला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱयांनी केले. गेल्या महिन्यात याप्रकरणी 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच वेळी तीन जबाबदार कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे.

तालुक्यातील म्हैसाळ गावच्या हद्दीत गट क्रमांक 1131, 1140, 1638, 1639, 1640 या जमिनी आहेत. या जमिनी दादासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, वसंत मगदूम, महेश बोंद्रे यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्याकडे माती उत्खननाचा परवाना आहे. त्यांना महसूल विभागाने 2018 मध्ये माती उत्खनन करण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी किती माती काढायची याची मोजणी निर्धारीत करून दिली होती. मात्र, निर्धारीत माती उत्खनन झाल्यानंतरही या ठिकाणची माती काढण्यात आली. सुमारे एक कोटी, 64 लाख, 34 हजार रूपयांची 16 हजार, 434 ब्रास मातीचे अवैध उत्खनन करण्यात आले. महसूल विभागाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक माती त्यांनी काढली होती. ती वीटभट्टीचालकांना पुरवण्यात आली. ही बाब महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यांना बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे 23 जणांवर ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौण खजिन उत्खनन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा नोंद झालेल्यामध्ये दादासाहेब बाबगोंडा पाटील, रावसाहेब बाबगोंडा पाटील, वसंत नरसाप्पा मगदूम, (सर्व रा. अंकली), महेश दिनकर बोंद्रे ( रा. हरिपूर) यांच्यासह पुष्पराज केदारराव शिंदे, सुभाष बाबू बजंत्री, जयपाल शिवाप्पा कुंभार, शरद दादू वनमोरे, मनोहर दादू वनमोरे, कृष्णकांत प्रकाश चव्हाण, शांतीनाथ आप्पसाहेब पाटील, (सर्व रा. म्हैसाळ ),अनिल यदगोंडा, पाटील, सूरज श्रीधर कुंभार, जयगोंडा चुडगोंडा पाटील, जयेंद्र रविंद्र कुंभार (सर्व रा.अंकली), रविंद्र शालीवाहन कुंभार, सुनील शालीवाहन कुंभार, चंद्रकांत कृष्णा हुलवान ( सर्व रा. मिरज), झाकीर हुसेन बापूलाल वजीर, (वड्डी), अरविंद गोविंद तांबवेकर (हरिपूर) यांचा समावेश होता.

महसूल विभागाने याबाबत चौकशी केली. यामध्ये तत्कालिन दोन मंडल अधिकारी आणि महिला तलाठी हे दोषी आढळून आले. त्यांनी या अवैध उत्खनानाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी तिघांवर कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे.