|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तिवरेत आजपासून तात्पुरत्या शेडची उभारणी

तिवरेत आजपासून तात्पुरत्या शेडची उभारणी 

अद्याप दोघी बेपत्ताच, शोधकार्य सुरूच

प्रतिनिधी/ चिपळूण

तिवरे धरण फुटून बाधित झालेल्या 45 कुटुंबांपैकी 15 जणांसाठी प्रत्येकी 300 चौरस फूटाच्या शेड गुरूवारपासून उभारल्या जाणार आहेत. या दुर्घटनेतील दोघींचे मृतदेह अद्याप सापडलेले नसून शोधकार्य सुरूच आहे. दुर्घटनेत बळी गेलेल्या चव्हाण परिवारातील व्यक्तींचे सामूहिक उत्तरकार्य 13 जुलै रोजी होणार आहे.

   तिवरे धरण फुटून 22 जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी 20 मृतदेह सापडले आहेत. तहसीलदार जीवन देसाई, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ  वाचलेल्या ग्रामस्थांच्या सुविधांकडे लक्ष पुरवत आहेत.

   बाधित कुटुंबांची चार घरांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. धरणाच्या वरील बाजूची सुरक्षित जागेवर त्यांना शेड बांधून दिल्या जाणार आहेत.  त्यानुसार येथे 15 कुटुंबाला प्रत्येकी 300 चौरस फुटाची शेड उभारली जाणार आहे. तर जनावरांसाठी प्रत्येकी 300 चौरस फुटाच्या दोन शेड बांधल्या जाणार आहेत. त्याचे काम गुरूवारपासून सुरू होत आहे.

  या दुर्घटनेत अनेकांचे महत्वाचे दाखलेही वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक व अन्य नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना दाखले दिले जात आहेत. आतापर्यंत 45 जणांना उत्पन्नाचे दाखले दिले गेले आहेत. तसेच उर्वरित दाखलेही लवकरच दिले जाणार असून त्यांच्या रेशकार्डची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांना पूर्वीच्या नोंदीप्रमाणे रेशनकार्डही दिली जाणार आहेत.

13 जुलैला सामुहिक विधी

या दुर्घटनेत बळी गेलेल्या चव्हाण परिवारातील व्यक्तींचा सामुहिक विधी 13 जुलै रोजी सकाळी अलोरे येथील करमणूक केंद्रात करण्याचा निर्णय नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यानुसार हा विधी होणार आहे.