|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यादवननगरातील निरापराधांची सुटका न झाल्यास तीव्र आंदोलन

यादवननगरातील निरापराधांची सुटका न झाल्यास तीव्र आंदोलन 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

यादवनगरातील मटकाबुकी सलीम मुल्ला याच्या बुकीवर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी काही निरापराध तरुणांना अटक केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करुन निरापराधांची सुटका करावी, अन्यथा उपोषण, आत्मदहन यासारखे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यादवनगरातील सुमारे दोनशे महिलांच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना मंगळवारी दुपारी देण्यात आले.

अवैधपणे सुरु केलेल्या सलीम मुल्ला याच्या मटका बुकीवर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा आपल्या पथकांच्या समवेत 8 एप्रिल, 2019 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मुल्लासह त्याच्या टोळक्याने पोलीस पथकावर हल्ला करुन, शर्मा यांच्या अंगरक्षकांचे जिवंत काडतूसासह पिस्तुल पळवून नेली होती. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यत सुमारे 39 जणांना अटक केली आहे. यामध्ये काही निरापराध तरुणाचा समावेश आहे. त्याची चौकशी करुन सुटका करावी. अशी मागणी यादवनगरातील महिलांनी पोलीस अधीक्षकांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने काही करता येणे शक्य नाही, असे सांगितले. त्यामुळे यादवनगरातील महिलांनी पोलीस अधीक्षकांच्याकडून योग्य आश्वासन न मिळाल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पण विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके पुणे दौर्यावर असल्याने त्यांच्या कार्यालयातील एका महिला पोलीस अधिकार्यांना महिलांनी मागणीचे निवेदन दिले.