|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजतागायत दिलेला निधी विसरू नका

आजतागायत दिलेला निधी विसरू नका 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने दलित वस्ती निधी वाटपामध्ये भाजप तालुकाध्यक्षांचा हस्तक्षेप नको, या मागणीसाठी सोमवारी बंडाचा पवित्रा घेतला. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास यांना निवेदनही दिले. पण मंगळवारी समितीमधील भाजप-सेनेच्या सदस्यांसह सत्तेतील घटकपक्षांच्या प्रतिनिधींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधून विचारणा झाल्यामुळे सदस्यांचे हे बंड शमण्याची शक्यता आहे.

प्रत्येक सदस्याला कोणकोणत्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला, कशाप्रकारे मदत केली याची दुरध्वनीद्वारे समिती सदस्यांसह संबंधित घटक पक्षांच्या नेत्यांना सुनावण्यात आले. आमदार सुरेश हाळवणकर व डॉ. सुजित मिणचेकर यांनीही आपल्या गटातील सदस्यांना खडे बोल सुनावल्याचे समजते. त्यामुळे भाजप-सेनेच्या सदस्यांचे हे बंड थंड होण्याची शक्यता आहे. मात्र समितीमधील जनसुराज्यच्या सदस्यांना अद्याप कोणतीही विचारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान पालकमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांसह दोन्ही काँग्रेसचे नेतेही आक्रमक झाले आहेत.