|Friday, October 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » त्यापुढे ब्रह्मानंदही फिका

त्यापुढे ब्रह्मानंदही फिका 

श्रीकृष्णाचे वर्णन करताना किन्नर पुढे म्हणाला-त्याच्या स्मरणाने संसारअरण्य उन्मळून पडते, तिथे त्याने यमलार्जुन वृक्ष पाडले हे सांगण्यात काय विशेष आहे? त्याने जांभई दिली तर ब्रह्मांड गिळू शकतो, मग त्याने बकासुर, कागासुर मारले यात काय नवल! अज्ञानासारखा बलाढय़ शत्रू ज्याने मारला त्याने अघासुर व तृणावर्त मारले याचा उच्चार करण्यात मोठा गौरव नाही. यमुनेच्या डोहात कालिया सर्पाचे थोबाड फोडून कृष्णाने जेव्हा त्याला वेसण घातली, तेव्हा तो मृत्यूच्याच मस्तकावर जणू नाचला. गोकुळातील गाईवासरे लपविण्याचा पराक्रम ब्रह्मदेवाने केला. तेव्हा त्याच्या नाकावर टिच्चून, त्याच्या डोळय़ांदेखत कृष्णाने आपल्या मायेने गाईवासरे निर्माण केली. कृष्णाच्या पराक्रमाची कक्षा जसजशी रुंदावत गेली व उंचावत गेली तसतसे दिव्यावर झेप घेऊन पतंग जळावे तसे असुर त्याच्या पराक्रमाच्या अग्नीत जळाले. एवढा मोठा कंस राजा, पण तो उभ्या उभ्या छाती फाटून मेला. त्याने प्रत्यक्ष यमावर स्वारी केली व सांदिपनी गुरुचा पुत्र सोडवून आणला. त्याच्या अचाट पराक्रमाचे वर्णन काय करावे? कृष्णाच्या पराक्रमाचा ताप सातही समुद्रांना सोसेनासा झाला म्हणून ते त्याला शरण गेले. त्यांनी आपल्या उदरातून सोन्याची द्वारका काढली व कृष्णाला खंडणी म्हणून दिली. वेदाची चोरी करून शंखासुर समुद्रात लपला तर अंशमात्र सामर्थ्याने श्रीकृष्णाने एखाद्या माशाप्रमाणे सागर धुंडाळला व शंखासुराला मारला. यमुना नदी मार्गात आडवी आली तर नुसत्या पायाच्या स्पर्शाने तिचे दोन तुकडे केले. सागरमंथनात सारी पृथ्वी दाताच्या अग्रावर तोलली. गाईंची पोटे भरण्यासाठी मूठभर गवताने व्यापलेला गोवर्धन कृष्णाने उचलला यात काहीच आश्चर्य नाही. त्याच्या पराक्रमाचे नुसते वर्णन केले तरी मोक्ष मिळतो. त्याचे सर्व वर्णन आता मी इथे करू शकत नाही. त्याच्याबद्दल मी आता एवढेच सांगतो की श्रीकृष्णाने आजवर जी दाने दिली, त्याच्या पुरात पृथ्वीवरील सारे राजे त्यांच्या लवाजम्यासह बुडाले आहेत. आकाशाच्या पृ÷भागावर तारकांच्या अक्षरांनी तोच इतिहास लिहिला आहे.

असे म्हणून किन्नर थोडा वेळ थांबला. त्याच्या गायनातील रसाने गगनाचे सरोवर भरून गेले. मग त्याने नृत्याचा आविष्कार करीत कृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन करण्यास प्रारंभ केला-श्रीकृष्णाचे रूप पाहताना जो आनंद होतो त्यापुढे ब्रह्मानंदही फिका पडतो. त्याच्या सौंदर्याला उपमा द्यावी असे एकही उपमान जगात नाही. त्याचे मुख चंद्रासारखे, डोळे कमळापेक्षा रेखीव, हात आजानुबाहु, वक्षस्थळ विशाल, उदरावर तीन वळय़ा, मांडय़ा भरीव व पीळदार आहेत. पोटऱया आटीव व घाटदार आहेत. त्याचे चरण तर विश्वातील तीर्थांचे उगमस्थान आहे. तो श्रीकृष्ण संसाराची उठाठेव नाहीशी करतो. अज्ञानाचा लेख पुसून टाकतो व त्याचे नामोनिशाण मिटवितो. त्याचा बांधा मध्यम आहे. पण सौंदर्य मात्र साऱया सृष्टीहून आगळे आहे. त्याचे सौंदर्य पाहिले की सर्वांगास डोळे फुटतात. सर्व वृत्ती डोळय़ात एकवटतात व कृष्णाचे सौंदर्य पहावे एवढाच ध्यास उरतो. बाकी सर्व गोष्टींचा विसर पडतो.