|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी 

पंढरपूर / संकेत कुलकर्णी :

  ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवणी , प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ’

संत चोखामेळांच्या अभंगाप्रमाणे गेल्या अठरा दिवसाचा प्रवास करून येणाऱया प्रत्येक वारकऱयांना पंढरीचे सुख हे त्रिभुवनात सामावणार नाही. कारण याठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा विठोबा आहे. या एकाच भावनेतून एकादशीच्या पूर्वसंध्येला येथे सुमारे 11 लाखांच्या भाविक दाखल झाले आहेत. तसेच एकादशीची शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस सपत्नीक पंढरीत गुरूवारी संध्याकाळी हजर झाले. 

गुरूवारी दशमी दिवशी विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूरच्या पुढे रांजणी रोडपर्यत पोहाचली होती. त्यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 22 ते 23 तासांचा कालावधी लागत होता. तसेच मुखदर्शनासाठी 9 तासांचा कालावधी लागत होता. एकंदरीत संपूर्ण दर्शन रांगेमध्ये किमान 80 हजारांहून अधिक भाविक उभारले असल्याचा अंदाज आहे.

एकादशींच्या सोहळयासाठी सायंकाळी उशीरापर्यत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह सर्व मानांचे संत पंढरीत येऊन विसावले होते. वाखरी येथून निघाल्यानंतर शितोळे सरकार यांनी माउलींच्या पादुका गळयात घेउन पंढरपुरात आणल्या. त्यामुळे कॉलेज रोडसह सारा परिसर गर्दीने आणि माउलींच्या आणि विठ्ठलनामांच्या गजराने दुमदुमून गेला होता.

सध्या पंढरी नगरी विठ्ठलमय होऊन गजबजून गेली आहे. गुरूवारी सकाळपासूनच नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. याशिवाय चंद्रभागेमध्ये पाणी असल्याने स्नानाचे पुण्य भाविकांनी घेतले. यात्रेमध्ये भाविकांची सोय व्हावी. याकरिंता प्रशासनाच्यावतीने अगदी शेवटच्या क्षणापर्यत तयारी सुरू होती. भाविकांच्या सोयीसाठी 3700 हून अधिक एसटी बसेस तर 18 हून अधिक रेल्वेच्या फ्sढऱया होत आहेत. सर्व मानाच्या पालखी सोहळयातून सुमारे 7 लाख भाविक पंढरीत आल्याचे सांगण्यात आले आहे. तर खासगी वाहने तसेच एसटी आणि रेल्वेतून तीन लाखांहून अधिक भाविक आल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

गतवर्षीच्या आषाढी यात्रेवेळी मराठा आरक्षणसंदर्भातील आंदोलनामुळे मुख्यमंत्री पंढरीत आले नव्हते. यंदा मात्र मुख्यमंत्री सपत्नीक महापूजेसाठी आले आहेत. फ्ढडणवीस चौथ्यांदा विठोबाची पूजा करणारे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यासमवेत राज्यमंत्रीमंडळातील सुमारे एक डझन मंत्री पंढरीत दाखल झाले आहेत.

गुरूवारी रात्रभर हरिजागर

शुक्रवारच्या एकादशींच्या सोहळयासाठी प्रमुख संताच्या पालख्यासमवेतच मोठया संख्येने भाविकांची दाटी पंढरपुरात झालेली दिसून आली. त्यामुळे एकादशीच्या पूर्वसंध्येला केवळ आणि केवळ पंढरपुरात हरिजागर झाला. त्यामुळे अवघी पंढरी नगरी एकादशीपूर्वीच दुमदुमण्यास सुरूवात झाली होती.