|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापूर जवाहर चौकात पुराचे पाणी

राजापूर जवाहर चौकात पुराचे पाणी 

राजापूर, माखजन :

राजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱया कोदवली व अर्जुना नदीला पूर आला आहे. गुरूवारी सायंकाळी कोदवली नदीच्या पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले.  शिवाजीपथ, चिंचबाध, वरचीपेठ येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. या पुराचा आठवडा बाजाराला फटका बसला असून विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान गडनदीला आलेल्य पुराने माखजन बाजारपेठेतही पुराचे पाणी घुसले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातून वाहणाऱया अर्जुना व कोदवली नदीचे पाणी बाजारपेठेत शिरले. कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत आले असून अर्जुना नदीच्या पुरामुळे शिवाजीपथ, गणेशघाट, नवजीवन पासून चिंचबांध ते वरचीपेठ रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिळ, गोठणे-दोनिवडे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वैशंपायन गुरूजी पुल तसेच गुजराळी कुंभारमळा येथील रस्त्यावर पाणी असल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे.