|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्यास वेग

शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्यास वेग 

वार्ताहर /  येडूर :

गणेशोत्सव आता दोन महिन्यावर आला आहे. येडूर परिसरातील मूर्तीकार गणेश मूर्ती बनविण्याच्या कामास गती देत आहेत. नवे येडूर येथील मूर्तीकार प्रभाकर दामोदर पोतदार यांनी गेल्या 65 वर्षांपासून शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. यंदा प्लास्टरच्या गणेश मूर्तीवर बंदी असल्याने शाडूच्या मूर्तीला मागणी वाढणार असल्याने शाडूच्या मूर्ती जास्त करण्यात येत आहेत. याला नागरिकांचा आतापासूनच प्रतिसादही मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.

शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्याची माहिती देताना पोतदार म्हणाले, आम्ही प्रत्येकवर्षी घरोघरी पूजनासाठी मूर्ती बनवतो. गणेश मूर्ती बनविण्यासाठी गडहिंग्लज येथून शाडू आणतो. 200 रुपये प्रति पोती असे 40 ते 50 पोती शाडूची खरेदी करण्यात येते. शाडू बारीक करुन चाळण्यात येतो व 1 जून पासून मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला जातो. शाडू पाण्यात भीजवून त्यामध्ये कापसाचे मिश्रण करण्यात येते. शाडू-कापूस याच्या मिश्रणाचे छोटे छोटे गट्टे तयार करण्यात येतात.  सदर शाडूचे गट्टे मूर्तीच्या साच्यात भरले जातात. नंतर शाडूची मूर्ती साच्यातून बाहेर काढून मूर्तीला रुप दिले जाते.

विविध आसनावर बसलेले 6 इंच ते दीड फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती तयार करण्यात येतात. जलप्रदूषण होणार नाही यासाठी साध्या रंगांचा वापर करण्यात येत आहे. नवे येडूर येथील शाडूच्या गणेश मूर्तीला सांगली, मिरज, अंकली, मांजरी, कल्लोळ, एकसंबा आदी भागात मोठी मागणी आहे. गणेश मूर्ती बनविण्यासाठी आमचे सर्व कुटुंबही सहभागी असते. शाडूच्या मूर्तीला मागणी वाढत असून रंगांच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या गणेश मूर्ती 10 ते 20 रुपयांनी महागण्याची शक्यता असल्याचे पोतदार यांनी सांगितले.