|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरात शिवार जलमय

पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरात शिवार जलमय 

प्रतिनिधी /बेळगाव :

गेल्या 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी रात्री तसेच गुरुवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे शिवारामध्ये पाणी झाले असून शेतकरी ते पाणी काढत आहेत. त्यामुळे ते पाणी थेट बळ्ळारी नाल्याला जात आहे. या नाल्यामधून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे बळ्ळारी परिसरातील शिवारामध्ये पाणी मोठय़ा प्रमाणात साचून राहिले आहे. सर्वात धोकादायक परिस्थिती म्हणजे हलगा-मच्छे बायपासमुळे शेकडो एकर जमीनीमध्ये पाणी तुंबले आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, अलारवाड, मजगाव, अनगोळ, मच्छे, परिनवाडी, धामणे, येळ्ळूर  शिवारामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचून आहे. बळ्ळारी नाल्यामुळे दरवषीच शेकडो एकरमधील जमीनीतील पिक कुजून जात होते. यावषी तर नाल्यामध्ये कचरा तसेच जलपर्णी मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे पाण्याचा निचराच होणे कठीण झाले आहे. यातच हलगा-मच्छे बायपासचा रस्त्याचे काम सुरुवात करण्यात आले आहे. शिवारामध्ये दोन्ही बाजुला चरी मारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मातीही टाकण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजुला पाणी तुंबले असून शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता या नुकसान भरपाईला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱयांनी तातडीने पाहणी करुन शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.