|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आठ दिवसांत प्रस्ताव द्या.. लगेच निर्णय देतो

आठ दिवसांत प्रस्ताव द्या.. लगेच निर्णय देतो 

प्रतिनिधी /खंडाळा :

निरा देवघरचे पाणी धोम बलकवडी कालव्यात टाकण्याबाबतचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर झालाच पाहिजे, असे आदेश जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकार्यांना दिले. हा प्रस्ताव आल्यास त्वरीत दोन दिवसांत निर्णय घेवून खंडाळा तालुक्याला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले यांना दिली. दरम्यान, ना. गिरीश महाजन यांच्या आणखी एका धडाकेबाज निर्णयामुळे खंडाळा तालुक्यातील गावांना या पाण्याचा लाभ होणार असून त्यामुळे खंडाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

निरा देवघर धरणातून खंडाळा तालुक्याला मिळणारे हक्क़ाचे पाणी गेली अनेक वर्ष मिळाले नाही. यासाठीच्या उपायोजनांची पुर्तता होण्याचा कालावधी लक्षात घेता ते काम त्वरेने होण्याची शक्यता नाही. यामुळे किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची भेट घेवून गावडेवाडी उपसा योजनेद्वारे निरा देवघरचे पाणी धोम बलवकवडीच्या कालव्यांत सोडण्याची मागणी केली. असे झाल्यास खंडाळा तालुक्यातील जनतेला पाणी मिळण्याची प्रक्रिया गतीने होण्यासोबत शासनाचाही मोठा खर्च वाचणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. मदन भोसले यांनी केलेल्या या मागणीबाबत कृष्णा खोरे महामंडळाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांनी मंत्री महाजन यांच्यापुढे सविस्तर सादरीकरण केले. निरा देवधर उजवा कालवा 1 ते 208 कि.मी. पैकी आतापर्यंत 1 ते 65 कि.मी. अंतरातीलच कामे बहुतांशी पुर्ण झाली आहेत. त्यापुढील कालवे भुसंपादनाअभावी झाले नाहीत. तसेच खंडाळा तालुक्यात 34 गावांना पाणी देण्यासाठीच्या या कालव्यावरील तीनही उपसा योजना झालेल्या नाहीत. त्यामुळे हे शिल्लक पाणी लाभ क्षेत्राबाहेर वापरले जाते. त्यासाठी देवघर कालव्यावरील गावडेवाडी, शेखमीरवाडी व वाघोशी तसेच धोम-बलकवडीची 0.93 टीएमसी उपसा योजना या चार योजनांऐवजी गावडेवाडी येथे एकच उपसा योजनेद्वारे धोम-बलकवडी कालव्यात पाणी सोडून या गावांना पाणी द्यावे. त्यातून धोम-बलकवडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आठमाही सिंचना राबविता येईल व निरा देवघर उपसाचे कालवा खर्चात भरीव बचत होईल, असेही मदन भोसले व घोगरे यांनी यावेळी मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले.