|Sunday, October 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अशा धमक्या खूप ऐकल्या आहेत!

अशा धमक्या खूप ऐकल्या आहेत! 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीने दिलेल्या धमकीवर भारताच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. अशा धमक्या आम्ही ऐकत आलो आहोत, या धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. जवाहिरीने बुधवारी एक चित्रफित प्रसारित करत ‘काश्मीरमधील दहशतवाद्यांना’ भारतीय सैन्य आणि सरकारवर हल्ले सुरू ठेवण्यास सांगितले होते.

आमचे सुरक्षा दल देशाचे सार्वभौमत्व तसेच सुरक्षा कायम राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सक्षम आहे. आम्हाला अशा कुठल्याच धमकीला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे रवीश कुमार म्हणाले.

जवाहिरीचा चित्रफितरुपी संदेश अल-कायदाच्या अल शबाब या प्रसारमाध्यम विषयक शाखेने प्रसारित केला होता. पाकिस्तान कशाप्रकारे काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालत आहे, याचा खुलासा जवाहिरीने या चित्रफितीत केला होता. अंसार गजवत-उल-हिंदचा प्रमुख जाकिर मूसा याला अलिकडेच भारतीय सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. मूसा हा काश्मीर खोऱयातील अल-कायदाचा प्रमुख होता.

सैन्यभरतीसाठी काश्मिरींमध्ये चढाओढ

अल-कायदा म्होरक्या जवाहिरीच्या या धमकीचा काश्मिरी तरुणाईवर कुठलाच प्रभाव पडलेला नाही. भारतीय सैन्याच्या भरती मोहिमेसाठी सुमारे 5500 काश्मिरी युवकांनी हजेरी लावली आहे. भारतीय सैन्यात सामील व्हा असे आवाहन एका काश्मिरी युवकाने केले आहे. सैन्यात सामील होण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याने युवकांनी तयारीवर भर द्यावा असेही त्याने म्हटले आहे.