|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इराणने रोखला ब्रिटिश टँकरचा मार्ग

इराणने रोखला ब्रिटिश टँकरचा मार्ग 

लंडन / वृत्तसंस्था :

मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. इराणच्या तीन नोकांनी आखातातील सागरी क्षेत्रात एका ब्रिटिश टँकरचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्याने एका युद्धनौकेला हस्तक्षेप करावा लागल्याची माहिती ब्रिटनच्या सरकारने गुरुवारी दिली आहे. बुधवारी घडलेल्या या प्रकाराबद्दल ब्रिटिश सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत 3 इराणी जहाजांनी होर्मूझ सामुद्रधुनीमधील ‘ब्रिटिश हेरिटेज’चा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्याचे ब्रिटनने सांगितले आहे. एचएमएस मोंट्रोसला इराणची जहाजे आणि ‘ब्रिटिश हेरिटेज’ यांच्या मध्ये पडावे लागले. तसेच इराणच्या जहाजांना इशारा दिल्यावर ती दूर झाल्याचे ब्रिटनकडून सांगण्यात आले आहे.

या कारवाईमुळे आम्ही चिंतित असून इराणच्या अधिकाऱयांना तणावाची स्थिती कमी करण्याचे आवाहन करतो असे ब्रिटन सरकारने म्हटले आहे. मागील आठवडय़ात जिब्राल्टरमध्ये ब्रिटिश अधिकाऱयांनी इराणचा एक तेलवाहू टँकर रोखला होता. हा टँकर युद्धग्रस्त सीरियामध्ये कच्चे तेल नेत होता. पण सीरियावर युरोपीय महासंघाने निर्बंध लादले आहेत.

जिब्राल्टरच्या किनाऱयावर एका देशाच्या तेलवाहू टँकरला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांचे परिणाम ब्रिटनला भोगावे लागतील. सागरी क्षेत्रातील असुरक्षेची सुरुवात ब्रिटनने केली असून याच्या परिणामांची जाणीव लवकरच होईल अशी संतप्त प्रतिक्रिया इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दिली होती.