|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय तंत्रज्ञांसाठी खूषखबर

भारतीय तंत्रज्ञांसाठी खूषखबर 

वॉशिंग्टन  / वृत्तसंस्था :

भारताच्या तंत्रज्ञांसाठी अमेरिकेतून चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने ग्रीनकार्ड विषयक प्रत्येक देशासाठी निर्धारित कमाल मर्यादेची तरतूद हटविली आहे. सद्यकाळात दरवर्षी ग्रीनकार्डच्या एकूण संख्येपैकी केवळ 7 टक्के कोटा एका देशाच्या अर्जदारांना उपलब्ध होतो.

नव्या निर्णयानुसार कुटुंब आधारित इमिग्रेंट व्हिसावर ही मर्यादा 7 वरून 15 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर रोजगार आधारित इमिग्रेंट व्हिसाकरता ही मर्यादा पूर्णपणे हटविण्यात आली आहे. या बदलामुळे अमेरिकेत काम करत असलेल्या कुशल भारतीय तंत्रज्ञांना लाभ होणार आहे.

बिगर-अमेरिकन नागरिकांना तेथे कायमस्वरुपी वास्तव्य तसेच काम करण्याची अनुमती ग्रीनकार्डच्या माध्यमातून प्राप्त होते. एच-1बी व्हिसावर दाखल होणाऱया भारतीय तंत्रज्ञांना ग्रीनकार्डवरील मर्यादेमुळे सर्वाधिक नुकसान झेलावे लागत होते. या मर्यादेमुळे भारतीय तंत्रज्ञांना ग्रीनकार्डसाठी 10 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. काही प्रकरणांमध्ये प्रतीक्षेचा कालावधी 50 वर्षांपेक्षाही अधिक झाला होता.

विविध देशांसाठी कमाल मर्यादा निर्धारित करणारी तरतूद हटविण्यासाठी सादर करण्यात आलेले विधेयक प्रतिनिधिगृहात 65 विरुद्ध 365 मतांनी संमत झाले आहे. या विधेयकाला आता सिनेटची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतरित होणार आहे.