|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुसळधार पावसाने ‘नॉन स्टॉप’ झोडपले

मुसळधार पावसाने ‘नॉन स्टॉप’ झोडपले 

विशेष प्रतिनिधी /पणजी :

राज्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसात मान्सून आक्रमक झालेला असून आणखी एक दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पणजीत गेल्या 24 तासात 4 इंच व गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात सांगे व केपे भागात 8 इंचापेक्षाही जास्त अशा विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सांखळीतील वाळवंटी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतूक रखडली. पावसामुळे राज्यातील जनजीवन अस्ताव्यस्थ झाले आहे.

संपूर्ण राज्याला गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे. राज्यात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेक भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. वादळी वाऱयामुळे झाडे कोलमडून पडलेली आहे. काही भागातील वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. गेले 48 तास नॉनस्टॉप पाऊस कोसळत आहे.

दक्षिण गोव्याला झोडपले

प्राप्त माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये पावसाने सर्वत्र जोर धरलेला आहे. त्यातल्यात्यात दक्षिण गोव्यात पावसाने अधिक जोर धरला आहे. सांगेमध्ये तब्बल 8.50 इंच तर केपेमध्ये सव्वा 8 इंच पावसाची विक्रमी नोंद एकच दिवसात झालेली आहे. मडगावात 110 मि. मी. म्हणजेच सव्वाचार इंच, फोंडा, मुरगाव व पणजीत 4 इंच, जुने गोवे व सांखळीत प्रत्येकी साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. पेडणे व काणकोणमध्ये प्रत्येकी 1 इंच पाऊस झाला. आगामी 24 तासात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाच्या अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.