|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाबुशना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतले हीच घोडचूक ठरली!

बाबुशना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतले हीच घोडचूक ठरली! 

प्रतिनिधी /मडगाव :

काँग्रेस पक्षात बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्रता याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. बाबुश मोन्सेरात यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेण्याची चूक केली, तीच महागात पडल्याची कबुली देखील त्यांनी दिली.

काँग्रेसचे दहा आमदार बंडखोरी करून गेल्यानंतर चेल्लाकुमार गोव्यात दाखल झाले. त्यांनी मडगावात काँग्रेसचे आमदार आणि पक्षाच्या काही पदाधिकाऱयांकडे चर्चा केली. दहा आमदारांनी बंडखोरी केल्याने, त्यांच्या विरोधात सभापतीकडे अपात्रता याचिका दाखल केली जाईल. जर त्या ठिकाणी न्याय नाही मिळाला नाही तर नंतर कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाबुश मोन्सेरात हेच प्रमुख सूत्रधार

बाबुश मोन्सेरात यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेऊ नका, असे आपण दोन वर्षापूर्वीच सांगितले होते. हल्लीच झालेल्या पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यास आपला विरोध होता. तरी सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली. हीच काँग्रेस पक्षाने केलेली मोठी चूक असल्याचे चेल्लाकुमार यांनी कबूल केले. दहा आमदार फुटून जाण्यामागे बाबुश मोन्सरात हेच प्रमुख सूत्रधार आहेत. जर बाबुशला काँग्रेसमध्ये घेतले नसते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती असे त्यांनी सांगितले.