|Sunday, October 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुल-राजनाथ यांच्यात लोकसभेमध्ये घमासान

राहुल-राजनाथ यांच्यात लोकसभेमध्ये घमासान 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

लोकसभेमध्ये गुरुवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात जोरदार ‘चर्चायुद्ध’ झाले. शेतकऱयांबाबत भाजप सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. शेतकऱयांच्या समस्यांबाबत सरकार उदासीन असल्याचेही ते म्हणाले. मात्र कृषीमंत्र्यांऐवजी राजनाथ सिंग यांनी या प्रश्नावर राहुल आणि काँग्रेसला लक्ष्य करत काँग्रेसच्या 70 वर्षातील गैरकारभार आणि चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱयांची परिस्थिती दयनीय झाल्याचा प्रतीआरोप केला. या दोघांमधील चर्चा, सवाल-जबाबामुळे शून्यप्रहर प्रभावी ठरला.

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तथापि, संसदेतील नेतेपद स्वतःकडे ठेवले आहे. हा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसअंतर्गत अनेक वाद आणि संकटे उफाळून आली आहेत. तरीही गुरुवारी राहुल यांनी दीर्घ काळानंतर सत्ताधाऱयांशी जोरदार वादविवाद करत आरोप आणि टिकेची झोड उठवली.

गुरुवारी शून्य प्रहरामध्ये राहुल यांनी देशभरातील शेतकऱयांची बाजू मांडली. देशातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीसह अनेक संकटांना तोंड देत आहे. मात्र भाजप सरकारचा शेतकऱयांविषयीचा दृष्टीकोन उदासिन आहे. धनदांडगे, उद्योजकांना सरकार मोठमोठय़ा रक्कमांची माफी देत आहे. पण काही हजार अथवा लाख रुपयाच्या कर्जासाठी शेतकऱयांना वित्तीय संस्थांचा त्रास सहन करावा लागत आहे. बँकांकडून शेतकऱयांचा छळ होत असल्याचाही आरोप राहुल यांनी केला आहे.

राहुल म्हणाले, केरळमधील वायनाड या आपल्या मतदारसंघात एका शेतकऱयांने थकित कर्जाच्या दबावाने आत्महत्या केली आहे. वायनाडमध्ये बँकांकडून कर्ज घेणाऱया 8 हजार शेतकऱयांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांची संपत्ती, मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने धनदांडग्यांचे साडेपाच लाख कोटी कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱयांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. शेतकऱयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही राहुल यांनी केला.