|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रशीद मलबारी पुन्हा बांगलादेशमध्ये?

रशीद मलबारी पुन्हा बांगलादेशमध्ये? 

प्रतिनिधी /बेळगाव :

कुख्यात गुंड व छोटा शकीलचा हस्तक रशीद मलबारी सध्या कुठे आहे? एक वर्षांपूर्वी अबुधाबी येथून बाहेर पडलेला रशीद पुन्हा भारतात आला आहे की बांगलादेशमध्ये त्याने आश्रय घेतला आहे? या प्रश्नाभोवती बेळगावसह कर्नाटक व महाराष्ट्र पालिसांचा तपास सुरु झाला आहे.

28 जून 2018 रोजी अबुधाबीत रशीदला अटक झाली होती. बेळगाव येथे खंडणीसाठी अपहरण, खून आदी गुन्हे केल्यानंतर पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी येथुन फरारी झालेल्या रशीदने कोलकत्तामार्गे बांगलादेश गाठले होते. बनावट पासपोर्टच्या सहाय्याने अबुधाबी गाठलेल्या रशीदला अटक झाली होती.

तेथील पोलिसांनी केंद्रिय गृहखात्याला गेल्या वषी यासंबंधी माहिती दिली होती. अबुधाबीत सापडलेला युवक रशीदच आहे याची खात्री पटवून घेण्यासाठी त्याचे फिंगरप्रिंट, रक्ताचे नमुने आदी पाठविण्याची जबाबदारी कर्नाटक पोलिसांवर सोपविण्यात आली होती. कारण यापूर्वी मंगळूरला त्याला अटक झाली होती.

रशीदला ताब्यात घेण्यासाठी वेळेत प्रयत्न झाले नाहीत. 30 जुलै 2018 रोजी अबुधाबीत त्याला जमीन मिळाली. त्यानंतर तो पुन्हा फरारी झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार रशिद बांगलादेशमध्ये आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी बेळगाव, मंगळूर व मुंबई पोलिसांची धडपड सुरु आहे.

बेळगाव, हुबळी-धारवाड, कारवार जिह्यात रशीद मलबारी व त्याच्या टोळीने खंडणीसाठी खून, अपहरण व बिल्डरांना धमकावण्याचे कृत्य केले आहे. तब्बल दोन वर्षे बेळगाव, सौंदत्ती परिसरात त्याचे वास्तव्य होते. बेळगाव येथील त्याचे कारणामे उघडकीस येताच तो येथून फरारी झाला होता. आता रशीदला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासंबंधी पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता माहिती मिळविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.