|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राकसकोप जलाशय पातळीत झपाटय़ाने वाढ

राकसकोप जलाशय पातळीत झपाटय़ाने वाढ 

वार्ताहर /तुडये :

राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी दिवसभर व गुरुवारी दिवसभर झालेल्या दमदार पावसाने जलशय पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 2466 फूट पाणी पातळी नोंद झाली. तर 82.6 मि.मी. पाऊस व एकूण पाऊस 808 मि.मी. पाऊस झाला आहे. सायंकाळपर्यंत या पाणी पातळीत वाढ झाली असून 2467 फुटापर्यंत पाणी पातळी गेली आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत आणखी दोन फूट वाढ शुक्रवार सकाळपर्यंत अपेक्षित आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास अजुनही 11 फुट पाण्याची आवश्यकता आहे. पावसाने असाच जोर कायम ठेवल्यास आठवडाभरातच जलाशय तुडुंब होईल. दि. 8, 9, 10 या तीन दिवसात जलाशयाची पाणी पातळीही 6 फुटाने वाढ झाली आहे. जलाशयात डेडस्टॉकपासूनचे एकूण 21 फूट पाणी साठा झाला आहे. तर डेडस्टॉकमधील 2444.35 फुटाच्या अंतिम पाण्यापासून एकूणच 22.65 फूट झाले आहे.

जलाशयाची 1 जुलै रोजी पाणी पातळी ही 2450.90 फूट इतकी होती. जुलै महिन्यांच्या 10 दिवसात 16 फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर दहा दिवसात 524 मि.मी. पाऊस झाला आहे.