|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बॉक्साईट रोडवर जीवघेणे भगदाड

बॉक्साईट रोडवर जीवघेणे भगदाड 

बेळगाव / प्रतिनिधी :

हनुमान नगर ते हिंडाल्कोपर्यंतच्या बॉक्साईट रोडचे रुंदीकरण मागील वषी केले होते. या दरम्यान मराठा मंडळ डेंटल कॉलेजसमोरील नाल्यावर पुलाचे बांधकाम केले होते. मात्र हा पूल खचला असून रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. हा धोकादायक खड्डा वाहनधारकांना जीवघेणा बनला आहे.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 100 कोटी अनुदानांतर्गत कोटय़वधीची तरतूद केली होती. यानुसार रस्त्याचे काम मागील वषी झाले होते. रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक घालण्यात आले आहेत. रस्त्या बरोबर या मार्गावरील नाल्याच्या पुलांची रुंदी देखील वाढविली होती. मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या प्रवेशद्वारा शेजारी असलेल्या नाल्याची रुंदी वाढविली होती. पण नाल्यावर बांधलेला पूल खचला आहे. या ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ तसेच भाजीमार्केटला ये-जा करणाऱया वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहन धारकांना हा रस्ता धोकादायक बनला आहे.

रस्ता उतार असल्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेले भगदाड वाहन धारकांच्या लक्षात येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्मयता आहे. स्थानिक नागरिकांनी याठिकाणी झाडांच्या फांद्या टाकून नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. पण रात्रीच्या वेळी ही बाब लक्षात येत नसल्याने दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची गरज आहे. गतवषी बांधलेले पूल खचल्याने रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. सदर कामाची चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.