|Sunday, October 20, 2019
You are here: Home » क्रिडा » ‘इंग्लिश एक्स्प्रेस’ चौथ्यांदा अंतिम फेरीत

‘इंग्लिश एक्स्प्रेस’ चौथ्यांदा अंतिम फेरीत 

विवेक कुलकर्णी /बर्मिंगहम :

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील यजमान इंग्लिश संघाने गुरुवारी येथील एजबस्टन मैदानावर बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी फडशा पाडला आणि आयसीसी क्रिकेट चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 27 वर्षांनंतर चौथ्यांदा धडक मारली. ऑस्ट्रेलियाने या लढतीत नाणेफेक जिंकली. पण, इतकेच यश त्यांच्या पदरी आले. इंग्लंडने नंतर फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर जोरदार वर्चस्व गाजवत कांगारुंचा अक्षरशः धुव्वा उडवला.

इंग्लंडने प्रारंभी ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकात सर्वबाद 223 धावांवर गुंडाळला तर नंतर धडाकेबाज फलंदाजी साकारत दोनच गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य साधले. इंग्लंडने 32.1 षटकांत 2 बाद 226 धावा जमवित विजय साकारला. विजयासाठी 224 धावांचे किरकोळ आव्हान असताना सलामीवीर जेसॉन रॉयने 65 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारांसह 85 धावा फटकावल्या तर जॉनी बेअरस्टोने 43 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. या जोडीने 17.2 षटकात 124 धावांची सलामी दिली व इथेच इंग्लंडच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली. जेसॉन रॉय मैदानी पंच कुमार धर्मसेना यांच्या खराब निर्णयाचा बळी ठरला. पण, तोवर इंग्लंडचा विजय ही निव्वळ औपचारिकता राहिली होती.

जेसॉन बाद झाला, त्यावेळी इंग्लंडच्या 17.4 षटकात 2 बाद 147 धावा झाल्या होत्या. नंतर जो रुट (46 चेंडूत नाबाद 49) व कर्णधार इयॉन मॉर्गन (39 चेंडूत नाबाद 45) यांनी तिसऱया गडय़ासाठी 79 धावांची अभेद्य भागीदारी साकारत यजमान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

खराब सुरुवात

घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण, त्यांना अपेक्षित सूर सापडलाच नाही आणि त्यानंतर यजमान संघाने या लढतीवर उत्तम वर्चस्व प्रस्थापित केले. कांगारुंतर्फे स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 85 तर ऍलेक्स कॅरेने 46 धावांचे योगदान दिले. एकवेळ 3 बाद 14 अशी दैना उडाली असताना या उभयतांनी चौथ्या गडय़ासाठी 103 धावांची भागीदारी साकारली होती.

प्रथम फलंदाजी घेतली असली तरी ऑस्ट्रेलियाला प्रारंभी या निर्णयाचा अपेक्षित लाभ घेताच आला नाही. डेव्हिड वॉर्नर (9), कर्णधार ऍरॉन फिंच (0) व पीटर हँडस्कॉम्ब (4) हे आघाडीचे तीन फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाले आणि कांगारुंची 3 बाद 14 अशी जबरदस्त पडझड झाली.

आफ्रिकन वंशाच्या जोफ्रा आर्चरने दुसऱया षटकातील आपल्या पहिल्याच चेंडूवर फिंचला पायचीत केले आणि कांगारुंना पहिला धक्का बसला. फिंचने या निर्णयाविरुद्ध डीआरएस घेतला. पण, यात डीआरएस देखील वाया गेला. फिंचला त्यामुळे महत्त्वाच्या उपांत्य फेरीत गोल्डन डकवर परतावे लागले. वोक्सने पीटर हँडस्कॉम्बचा त्रिफळा उडवला तर बहरातील वॉर्नरचा काटाही वोक्सनेच काढला.

या पडझडीमुळे पहिली 7 षटके पूर्ण होण्याआधीच ऑस्ट्रेलियाची 3 बाद 14 अशी दाणादाण उडाली.

कॅरे-स्मिथची शतकी झुंज

पुढे, कॅरे व स्टीव्ह स्मिथ यांनी चौथ्या गडय़ासाठी 103 धावांची शतकी भागीदारी साकारत संघाचा डाव सावरण्याचा मोलाचा प्रयत्न केला. फिरकीपटू अब्दुल रशीदने कॅरेला फ्लिक करण्याच्या मोहात पाडले आणि कॅरे या जाळय़ात अलगद सापडला. डीप मिडविकेटवरील बदली खेळाडू व्हिन्सने झेल घेतल्यानंतर कॅरेची खेळी संपुष्टात आली आणि ही जोडीही फुटली. त्यानंतनर स्टोईनिसला आल्या पावलीच शून्यावर पायचीत करत रशीदने आणखी एक धक्का दिला. स्टोईनिसने या निर्णयाबद्दल नाराजी दर्शवली. पण, रिप्लेत मैदानी पंचांचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट झाले.

स्टीव्ह स्मिथचा लढा

एका बाजूने पडझड सुरु झाली असताना दुसऱया बाजूने स्टीव्ह स्मिथने मात्र फटकेबाजीचा धडाका कायम राखला होता. सध्या फारशा बहरात नसलेल्या मॅक्सवेलने 23 चेंडूत 22 धावा जमवल्या. नंतर आर्चरने त्याला मॉर्गनकरवी झेलबाद केले. पॅट कमिन्स 10 चेंडूत 6 धावा जमवू शकला तर मिशेल स्टार्कने वोक्सच्या गोलंदाजीवर बटलरकडे झेल देण्यापूर्वी 36 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. बेहरेनडॉर्फचा वूडने एका धावेवर त्रिफळा उडवला.

स्टीव्ह स्मिथने आपल्या 119 चेंडूतील खेळीत 6 चौकार फटकावले. पण, त्याची झुंज एकाकी ठरली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकात सर्वबाद 223 धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडतर्फे ख्रिस वोक्सने 20 धावात 3 तर अब्दुल रशीदने 54 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, जोफ्रा आर्चरने 32 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मार्क वूडने बेहरेनडॉर्फचा झेल घेतला तर स्मिथ धावचीत झाला होता.