|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा तालुक्यात पावसाचा जोर कायम

फोंडा तालुक्यात पावसाचा जोर कायम 

प्रतिनिधी /फोंडा :

बुधवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱया मुसळधार पावसाचा जोर कायम असून फोंडा तालुक्यातील विविध भागामध्ये मोठय़ाप्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या. खांडेपार नदीसह, छोटेमोठे ओहळ व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. दाग-फोंडा येथे दोन घरांमध्ये पाणी शिरले तर सावईवेरे, कदंब बसस्थानक फोंडा येथे वाहनांवर झाडे कोसळली. तालुक्यातील विविध भागांमध्ये घरांवर व रस्त्यावर झाडे कोसळण्याच्या बऱयाच घटना घडल्या. उसगाव, सावईवेरे, म्हार्दोळ, तळावली, बेतोडा व इतर भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीज प्रवाह खंडित होता. काही भागांमध्ये विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मदतकार्यासाठी फोंडा व कुंडई अग्नीशामक केंद्राच्या कर्मचाऱयांची धावपळ सुरु होती.

खांडेपार नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर

बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर जोरदारपणे कोसळणाऱया पावसाने तालुक्यातील विविध भागांना झोडपून काढले. किंचित विश्रांती घेत सतत कोसळणाऱया या पावसाचा येथील जनजीवनावरही परिणाम झाला. कुर्टी पंचायत क्षेत्र व फोंडा शहरातून वाहणाऱया मुख्य नाल्याने काठ ओलांडल्याने नागझर कुर्टी येथील महादेव मंदिर पाण्याखाली गेले होते. दाग-कवळे येथील रंगनाथ कवळेकर यांच्या घरात पाणी शिरले तर शेजारील जनी कवळेकर यांच्या घरालाही पाण्यापासून धोका निर्माण झाला होता. कपिलेश्वरी येथील अंडरपास व चौपदरी रस्त्यामुळे या घरांची पातळी खाली राहिल्याने पावसाचे पाणी थेट त्यांच्या घरात शिरले. खांडेपार नदीचा प्रवाह वाढल्याने बऱयाच ठिकाणी पाणी धोक्याच्या पातळीवर पोचले होते. तालुक्यातील इतर भागांमध्येही ओहळ व नाले आटोकाट भरुन वाहत आहेत.

फोंडा अग्नीशामक केंद्रामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पडझडीच्या एकूण 24 घटनांची नोंद झाली होती. त्यापैकी साधारण दहा ठिकाणी पडलेली झाडे हटविण्यात आली असून अन्य घटनांमध्ये मदतकार्य सुरु होते. सावईवेरे येथे पात मैदानाजवळ एक कारगाडी व एका मारुती व्हॅनवर झाड कोसळले. कदंब बसस्थानक फोंडा येथे रिक्षावर झाड कोसळून अंदाजे 50 हजारांची हानी झाली. काराय-शिरोडा येथील जल्मी देवस्थानवर माड कोसळला. त्यात 70 हजारांची हानी झाली. धोणशी-बांदोडा येथे घरावर झाड पडल्याने साधारण 10 हजारांची तर वारखंडे-फोंडा येथे घरावर दोन झाडे पडून 20 हजारांची नुकसानी झाली. तळे दुर्गाभाट येथेही एका घरावर वृक्ष कोसळला. याशिवाय बऱयाच ठिकाणी रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.