|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हळदोणा मतदारसंघाला वादळाचा फटका

हळदोणा मतदारसंघाला वादळाचा फटका 

प्रतिनिधी /म्हापसा :

गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी घरावर, रस्त्यावर, कुंपणांवर तसेच काही ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या गाडय़ावर झाडे पडून त्यांचे नुकसान झाले. मुड्डीवाडा कारोणा येथे जॉन डिकुन्हा यांच्या घराला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून त्यांचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले तर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन 5 लाखांची मालमत्ता विचविण्यास यश मिळविले. ओळावली पोंबुर्फा येथे वादळामुळे झाडांची बरीच पडझड झाली तसेच घरेही मोडली गेली. एकूण 8 घरांना याची झळ बसली त्यात 6 लाख रुपयांची नुकसानहानी झाली असल्याचे माहिती म्हापसा अग्निशमन दलानी दिली. सकाळी 7 ते सायं. 7 या दरम्यान म्हापसा अग्निशमन दलात एकूण 35 ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची तक्रार नोंद झाली होती. दलाचे जवान झाडे हटविताना दिवसभर मग्न होते. सकाळी 8.30 च्या दरम्यान डॉन डिकुन्हा रा. मुड्डीवाडा कारोणा यांच्या घराला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून या आगीत पूर्ण घर, साऊंडसिस्टम, घरातील सामान, इलेक्ट्रीक आयटम साहित्य आदी पूर्णपणे जळून खाक झाले. दरम्यान यांच्या घराला आग लागल्याची माहिती पंच सदस्य तेजा वायंगणकर यांनी दिली.

दरम्यान मंगळवारी दि. 9 रोजी झालेल्या वादळामुळे हळदोणा व ओळावली-पोंबुर्फा पंचायत क्षेत्रात अनेक झाडे उन्मळून घरांवर तसेच वीजवाहिन्यांवर पडली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रॅण्ड कारोणातील आठ घरांचे मिळून 5 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही घटटा मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. कारोणा व ओळावली या गावांच्या सीमा भागात या चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला. अनेक घरांचे पत्रे उडाले. बऱयाच घरांवर, रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळल्याने काही तास बत्ती गुल झाली. शिवाय आंबा, आंबाडो, सागवान यासारखी मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली होती. ग्रॅण्ड कारोणातील जेफरीना आंतोन डिलीमा, तुळशीदास मांद्रेकर, शिवराम कळंगुटकर, चंद्रकांत फाळकर, मार्गरेट फर्नांडिस, टोनी फर्नांडिस यांच्या घरावरही झाडे कोसळली. काहींच्या घराच्या मागच्या बाजूने, काहींच्या स्वयंपाक खोलीवर तर काहींच्या पत्र्यांच्या शेडवरही झाडे कोसळल्याने आ]िर्थक फटका सोसावा लागला.