|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कमलाकर नाडकर्णींचे सत्य विधान

कमलाकर नाडकर्णींचे सत्य विधान 

वयाच्या ऐंशीव्या वर्षी आपल्याला मिळालेल्या नाटय़ परिषदेच्या जीवन गौरव सन्मान सोहळय़ात ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळकटी देणारे ‘नाटय़संमेलन नको, प्रायोगिक रंगमंच हवा!’ असे विधान केले आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या लेखणीबरोबरच बोलण्यातील चांगुलपणाच्याच स्पष्टतेचा प्रत्यय दिला.

अलीकडेचआपल्याला मिळालेल्या नाटय़ परिषदेच्या जीवन गौरव सन्मान सोहळय़ात कमलाकर नाडकर्णी यांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळकटी देणारे ‘नाटय़ संमेलन नको, प्रायोगिक रंगमंच हवा!’ असे विधान केले आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या लेखणीबरोबरच बोलण्यातील चांगुलपणाच्याच स्पष्टतेचा प्रत्यय दिला.

त्यांच्या नाटय़ समीक्षेचा उदय हा खऱया अर्थाने विवेकवादी समीक्षेचा उदय म्हणता येईल. असे नसते, तर कोणत्याही अमिषाला बळी न पडणाऱया या समीक्षकाने बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या महाराष्ट्रातील कट्टर हिंदुत्ववादी अस्मितेचा मानदंड समजल्या जाणाऱया, बडय़ा राजकीय नेत्यांशी लागेबांधे सांभाळणाऱया इतिहासकाराच्या ‘जाणता राजा’ या चर्चित नाटकाला ‘पुरंदरेंची ग्रेट सर्कस’ म्हणण्याचे धाडस केले नसते. (त्यानंतरच्या जयंत पवार यांच्या नाटय़ समीक्षेने ही रेषाही अधिक ठळक केलेली दिसते.) त्यामुळेच ‘नाटय़ संमेलन नको, प्रायोगिक रंगमंच हवा!’ या नाडकर्णींच्या विधानाला वजन प्राप्त होत आहे. त्यांच्या या वक्तव्यालाही एक इतिहास आहे, तो आपण नीट समजून घेतला नाही, तर त्यांच्या बोलण्यातील तळमळ, गांभिर्य निघून जाईल. मराठी प्रायोगिक रंगभूमीचे कर्तेधर्ते दिवंगत दामू केंकरे आणि त्यांच्या सहकाऱयांनी काही वर्षांपूर्वी भर पावसात मुंबईत यशवंत नाटय़गृहाबाहेर थांबून प्रायोगिक नाटय़गृहाची मागणी केली. त्या मागणीकडे आजवर दुर्लक्ष तर झालेच परंतु मराठी व्यावसायिक रंगभूमी ज्या समांतर रंगभूमीमुळे उर्जितावस्थेत राहिली, त्या रंगभूमीच्या जिवंतपणासाठी पुढे फारसे काही केले गेले नाही. ‘जे चमकते, तेच महत्त्वाचे’ या न्यायाने प्रायोगिक रंगभूमीच्या संवर्धनासाठी मुंबई शहरात अजूनही तसे गांभिर्याने काहीही केले गेले नाही. तसे नसते, तर आज प्रायोगिक नाटकांची तालीम कुठे करायची, असा प्रश्न प्रायोगिक रंगकर्मींना पडला नसता. वास्तविक, काही वर्षांपूर्वी छबिलदास विद्यालयातील जागा प्रायोगिक रंगकर्मींना तालमीसाठी मिळत होती. पण तीही गेली. या संदर्भात दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, नाना पाटेकर अशा किती तरी विचारशील रंगकर्मींनी जबाबदारीने वक्तव्य केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अर्थात हा जुना इतिहास असला, तरी सद्यस्थितीत हा इतिहास पुनः पुन्हा आठवत रहावा, अशीच आजच्या प्रायोगिक रंगभूमीची स्थिती आहे. त्याला कारण मराठी व्यावसायिक रंगभूमीला दिग्गज नट देणाऱया या रंगभूमीला हवी तशी सुविधा प्राप्त न होणे हेच आहे. आज मुंबईच्या तुलनेत पुणे आणि महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागाबरोबरच राज्याबाहेरील उत्तम प्रायोगिक नाटके सादर होताना दिसतात. ती नाटके अनेक रंगमहोत्सवात सादर होऊन चर्चिली जातानाही दिसतात. यामागची त्या त्या भागातील रंगकर्मींची तळमळ आहेच परंतु नाटकांच्या तालमीसाठी त्यांना हवी असलेली जागा उपलब्धता हेही कारण आहेच. मुंबईसारख्या मराठी अस्मितेची राजधानी असलेल्या शहरात नाडकर्णींच्या या मागणीचा गांभिर्याने विचार केला गेल्यास मराठी भाषा संस्कृतीची जपणूक होणार आहे. कारण कोणतीही भाषा जशी तिच्या सातत्याच्या संवादातून टिकते, तशी ती त्या भाषातील मूलभूत कला संस्कृतीतूनही टिकत असते हे आपण लक्षात घ्यायला हवे आणि प्रायोगिक रंगभूमी ही त्या त्या मातृभाषेच्या बोलीच्या घुसळणीतून घडत जात असते. जगाच्या बदलाचे नेमके भान प्रायोगिक रंगभूमी देत असते आणि या सजग भानाला भाषा हा महत्त्वाचा घटक अधिक बळकटी देत असतो. कारण प्रायोगिक नाटक म्हणजेच एकप्रकारे आपली भाषा बोली, संस्कृती. मात्र, या दृष्टीने आपल्याकडे फारसा विचार केला गेलेला दिसत नाही. त्यामुळेच स्वतःचे फॅशनेबल चकचकीत आयुष्य जगणारा कोणताही रंगकर्मी उत्तम प्रायोगिक नाटक सादर करेलच, याची शाश्वती नाही. याबाबत असे आयुष्य जगणाऱया तरीही आम्ही प्रायोगिक रंगभूमीतून पुढे आलो म्हणणाऱयांची प्रायोगिक रंगभूमीची बांधीलकीही तपासून बघायला हरकत नाही. आपल्याकडे अपवाद वगळता नटांची समज वाढत गेलेली आढळत नाही. अनेक नट माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने व्यक्त होतात, त्यातून याची प्रचिती येते. यासाठी प्रारंभीच त्यांनी प्रायोगिक रंगभूमीकडे वळायला हवे. तशी जमीन आपल्या रंगभूमीसंदर्भात तयार झाली, की रंगभाषा हीच जीवनभाषा असते हेही त्यांच्या लक्षात येत जाईल. पण आता प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीतील अंतर धूसर होत गेलेल्या किंवा नाटक हे नाटक असते, चांगले किंवा वाईट, किंवा आपला हेतू साध्य करण्यासाठी व्यक्तीचरित्रात्मक नाटकाला प्रायोगिक नाटक म्हणायची अलीकडे फॅशन आलेल्या काळात असे म्हणणे अडाणीपणाचेही ठरण्याची वेळ आली आहे. अशावेळी नाडकर्णींनी प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र रंगमंच हवा असल्याची मागणी केली आहे. अर्थात कलेच्या निष्ठेप्रतीच असे वक्तव्य केले जाऊ शकते. एक नाटय़गृह होते, तेव्हा त्या नाटय़गृहात त्या त्या नाटय़ प्रकाराला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असतात. मुंबईत प्रायोगिक नाटकांसाठी खास नाटय़मंच तयार झाला, तर या नाटय़ प्रकारासाठी लागणाऱया सुविधा तर निर्माण होतीलच परंतु त्यातून रंगकर्मींना प्रेरणाही मिळेल. नाडकर्णींनी ‘नाटय़ संमेलन नको, प्रायोगिक रंगमंच हवा!’ असे वक्तव्य केले असले, तरी त्यामागे संमेलन नकोच, असा त्यांचा हेतू नाही. तर एखादवेळी नाटय़ संमेलन नाही झाले, तरी चालेल पण प्रायोगिक रंगमंच उभारा असा आहे. खरेतर नाटय़ संमेलनात ज्या ज्या विषयांची चर्चा होते, त्याचे पुढे काय होते हा संशोधनाचा विषय आहे. अपवादात्मक गोष्ट घडली असेल एवढेच. बऱयाचवेळा संमेलनाला नाटय़पंढरी समजून जाणाऱया आणि नाटकावर निस्सीम प्रेम करणाऱया रसिकांना नाटय़ संमेलनाच्या गावी सुविधा प्राप्त होत नाहीत. एवढेच काय, तर नाटय़विषयक ग्रंथ विक्री करणाऱयांनाही जागा प्राप्त होत नाही. बऱयाचवेळा राजकीय लोकांच्या हातात अशी संमेलने जात असतात. अभिनेत्री लालन सारंग यांच्या अध्यक्षतेखाली  झालेले कणकवली नाटय़ संमेलनाचे उदाहरण यासाठी पुरेसे आहे. आयोजक, हौशी, नाटय़ परिषदवाले मिरवणारे आणि रंगकर्मी चमकणारे अशीच स्थिती बहुसंख्यवेळा असते. त्यामुळे संमेलन हा नाटय़ जत्रोत्सवाचाच मामला ठरतो की काय असा प्रश्न पडावा असा हा सारा प्रकार असतो. वास्तविक, संमेलन हा नाटय़मेळा असेल, तर त्यातील विचारांच्या आदान प्रदानाचे पुढील काळात विचारसत्त्व सापडायला हवे ना. उलट संमेलनात नाटय़ परिषदेबद्दल किंवा सरकारच्या चुकीच्या नाटय़ धोरणांबद्दल कोणी स्पष्टच बोलले, तर त्याविरोधातच प्रतिक्रिया येतात. या पार्श्वभूमीवर नाडकर्णींचे विधान नाटय़ चळवळीचाच विवेक जागृत करणारे आहे!

अजय कांडर

Related posts: