|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भेसळीच्या हिमनगाचे टोक

भेसळीच्या हिमनगाचे टोक 

अन्न हे आपले औषध असले पाहिजे, आपले औषध हे अन्न असले पाहिजे, असे म्हटले जाते. कारण अन्न हे शरीराचे पालनपोषण करते, ऊर्जा देते. शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करून शरीराची सर्व कार्ये उत्तम प्रकारे चालवण्यासाठी मदत करते. थोडक्यात, शरीर हे सकस आहारावर पोसलेले असे एक स्वयंचलित यंत्र आहे की ज्याला विचार करायला शिकवले आहे. म्हणूनच एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यावर अवलंबून असते. सदृढ आणि तंदुरुस्त शरीर सामाजिक स्वास्थ्याशी आणि विकासाशीही निगडित असते. येत्या पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सकडे नेण्याचा महत्त्वाकांक्षी विचार सध्या सरकार करीत आहे, ही चांगली बाब आहे. पण त्यासाठीदेखील सामुदायिक उर्जेची गरज आहे. ती पुन्हा लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या स्वप्नरंजनात असताना अन्नभेसळीसंदर्भात संसदेत सादर झालेल्या गंभीर अहवालाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सरकारने याकडे धोक्याची घंटा म्हणून पहावे. मागील वर्षात म्हणजे 2018-19 मध्ये देशभरातील विविध प्रकारचे अन्नाचे नमुने तपासले असता त्यापैकी एक तृतियांश अन्नाचे नमुने हे भेसळ अथवा अन्नसुरक्षा निकषांमध्ये न बसणारे आढळले. वास्तविक अन्नभेसळीचे हे हिमनगाचे एक टोक म्हणावे लागेल. देशभरातील एकूण 65 हजार अन्नपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 20 हजार नमुन्यांमध्ये अन्नसुरक्षेचे प्रमाणित निकष नसल्याचे दिसून आले. मागील  दोन वर्षातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिवसेंदिवस भेसळीच्या प्रमाणात धोकादायकरित्या वाढ होत असल्याचेही दिसून येते. बाजारपेठेतील अन्नाची तयार पाकिटे, बॉटल्स तसेच विविध हॉटेल्समधील अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. भेसळीमध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाब ही दोन राज्ये आघाडीवर असून, महाराष्ट्रातील भेसळीचे प्रमाणदेखील चिंतनीय आहे. अन्न व औषध निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची स्थापना केली. पण या विभागाची देशातील अवस्था अत्यंत भीषण आहे. प्रत्येक जिल्हय़ामध्ये कार्यालये उघडली. कित्येक ठिकाणी त्यांचे अस्तित्व नावापुरते आहे. काही जिल्हय़ांमध्ये प्रयोगशाळा उभारल्या. पण नमुने तपासण्याची आणि मानांकन देण्याची या विभागाची भ्रष्ट कार्यपद्धती हा एक संशोधनाचा विषय ठरावा. मुळात ही कार्यालये शोधावी लागतात. याचे उदाहरण कोल्हापुरातील कार्यालयाचे देता येईल.  अंदाजे सातशे चौरस फुटाच्या टीचभर जागेत हे कार्यालय आहे. आजतागायत तिथे काही सुधारणा झाल्या नाहीत. अपुरे मनुष्यबळ हा एक स्वतंत्र विषय ठरावा. अन्न तपासणीसारख्या महत्त्वाच्या अधिकाऱयाचे पद रिक्त आहे. अन्न निरीक्षकाकडे त्याचा पदभार आहे. पण त्याला  अधिकार नाही. वास्तविक कायद्यानुसार भेसळखोरांना एक लाखापासून दहा लाखांपर्यंत दंड, मृत्यू झाल्यास सात वर्षे कारावास ते जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख दंडाची तरतूद आहे. कायदे सक्षम व कडक पण अपुऱया कर्मचाऱयांमुळे भेसळीच्या अवाढव्य साम्राज्यापुढे त्यांचा टिकाव लागत नाही. लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी निगडित असलेल्या या विभागाकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. एकूणच मरगळ आल्याने भेसळीचे विष घराघरात पसरत आहे. सध्याच्या चंगळवादी व धावपळीच्या व्यवस्थेत आरोग्य मिळवणे दुरापास्त झाले असताना व जीवन जगण्याची कसरत करावी लागत असताना या विभागाच्या कारभारामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. दुर्दैवाने सध्या 90 टक्क्यांहून अधिक आजारास जशी ताणतणावाची जीवनशैली कारणीभूत आहे  त्याप्रमाणे भेसळयुक्त अन्नदेखील जबाबदार ठरत आहे. आरोग्यदायी अन्न महाग मिळत असताना जंक फूड एवढे स्वस्त का मिळते, याचा कोणी विचारच करत नाही. जीवनावश्यक वस्तू व अन्नपदार्थांच्या भेसळीचे फार मोठे आव्हान सरकारसमोर आहे. शुद्ध  तुपात डालडा, खाद्यतेलात मिनरल ऑईल, हळद पावडरमध्ये पिवळा रंग, खाद्यपदार्थात धुण्याचा सोडा, मिठाईला चांदीऐवजी ऍल्युमिनियमचा वर्ख यासारख्या भेसळीच्या प्रकारांना ग्राहकांना सामोरे जावे लागते. सर्वात गंभीर बाब दूध भेसळीची आहे. देशातील  68 टक्के दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे भेसळयुक्त असल्याचे वास्तव आहे. दररोज 15 कोटी लिटर दुधाचा वापर देशात केला जातो. त्याची हाताळणी पॅकेजिंग, कंटेनर धुण्याची पद्धत  व स्वच्छतेबाबतचा कारभार ‘राम भरोसे’ आहे. दुधाला घट्टपणा येण्यासाठी व टिकण्यासाठी डिटर्जंट युरिया, स्टार्च, ग्लुकोज, फॉर्मेलिनचा वापर होतो, हे काही लपून राहिलेले नाही. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानातील बदलाच्या प्रचंड वेगामुळे जीवनशैली बदलली आहे. हा बदल अस्वस्थ करणारा असला तरी अपरिहार्य आहे. परिणामी नको त्या अन्नसंस्कृतीला ही जीवनशैली खतपाणी घालत आहे. ती रूजत आहे, फोफावत आहे. अन्नपदार्थ निवडीमध्ये चुकीचे स्टेटस सिंबॉल बनत आहेत. दैनंदिन आयुष्यातील प्रचंड गतिमानता, चमचमीत पदार्थांची श्रीमंती, आजाराला आमंत्रण देत आहेत. आता तर काही कंपन्यांनी फूड डिलिव्हरी चेन बाजारात आणली आहे.  यावर कुणाचेही नियंत्रण नाही. कंपनीने निर्देशित केलेल्या 100 भर हॉटेलच्या पसाऱयातील एखाद्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे पॅकेट तुमच्या दारापर्यंत येते. पण ते नक्की कुठून येते, तिथे स्वच्छतेची काय व्यवस्था आहे, स्वयंपाक खोलीची किती स्वच्छता आहे, याबाबत ग्राहक पूर्णपणे अनभिज्ञ असतो. एका क्लिकवर ‘डिश’ मिळते, यातच त्याचे समाधान. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक व सकस अन्न घ्या, अशी आपली संस्कृती आणि परंपरा सांगते. पण ते शुद्ध आणि भेसळमुक्त आहे, याची हमी नाही. आधुनिक जीवनशैलीतील गतिमानता आणि पूर्वापार चालत आलेले शहाणपण याचा सुंदर मेळ घालणे तेवढे आपल्या हातात आहे!

Related posts: