|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग ग्रामस्थांची वीज वितरणला धडक

दोडामार्ग ग्रामस्थांची वीज वितरणला धडक 

आवाडेत महिलांचा रास्तारोको : साटेली-भेडशीत 17 रोजी आंदोलन : विजपुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱयांचे आश्वासन

वार्ताहर / दोडामार्ग:

 तिराली खोऱयातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने त्रस्त ग्राहकांनी शुक्रवारी दोडामार्ग वीज महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाला धडक दिली. साटेली-भेडशी परिसरातील मोर्ले, कोनाळ, केर, घोटगे- वायंगणतड, तिलारी, शिरंगे, आवाडे आदी गावांतील ग्रामस्थांनी ठिय्या मारत उपकार्यकारी अभियंता देहारे यांना धारेवर धरले. यावेळी महावितरणच्या साटेली-भेडशी येथील सबस्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक अभियंता जीवन चराठे यांच्या तक्रारांचा पाढा वाचत यांच्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. तसेच शुक्रवारी सायंकाळी आवडे गावातील महिला व ग्रामस्थांनी विजेच्या समस्यांसाठी रास्तारोको करीत वीज वितरणच्या अधिकाऱयांचे लक्ष वेधले. उशिरापर्यंत रास्तारोको सुरूच होता.

गेल्या महिन्याभरापासून दोडामार्ग शहरासहीत संपूर्ण तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने दोडामार्ग तसेच साटेली-भेडशी येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणच्या नळयोजनांवर याचा परिणाम झाला आहे. या महावितरणच्या कारभाराला कंटाळलेल्या ग्राहकांनी अखेर थेट दोडामार्ग उपविभागीय कार्यालयाला धडक दिली. यावेळी ग्रामस्थांनी तालुक्यातील खेळखंडोबाबत नाराजी व्यक्त करीत देहारे यांना जाब विचारला. वायंगणतड येथे चार विद्युत पोल वादळी वाऱयाने गेल्या काही दिवसांपासून उन्मळून पडले आहेत. तेथील ग्रामस्थांनी या पुलाच्या आजूबाजूची झाडी स्वतःहून साफ केली. या पोलांची माहिती या भागातील महावितरणचे सबस्टेशन असलेल्या साटेली-भेडशीमधील जीवन चराठे यांना देऊन सुद्धा काही कार्यवाही झाली नाही. तर आवाडे येथील ग्राहकांची घरातील विद्युत उपकरणे, साहित्य हे कमी उच्च दाबाच्या विजेमुळे जळून नुकसान झाले. त्याकडेही गांभीर्याने पाहिले नाही. तसेच मोर्लेमधील जीर्ण पोल व जीर्ण विद्युत वाहिन्यांमुळे त्याठिकाणी धोका निर्माण झाला असून त्याकडेही दुर्लक्ष का करण्यात येत आहे. असा सवाल  देहारे यांना विचारण्यात आला.

अधिकारी बेपत्ता तर….. पोलिसात तक्रार द्या!

  साटेली-भेडशी सबस्टेशनमधील सहाय्यक अभियंता जीवन चराठे हे आपल्या कार्यालयात कधीच उपलब्ध नसतात. तसेच कधीकाळी जेव्हा त्यांची भेट होत, तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांना आमच्या गावातील वरील सर्व समस्या सांगितल्या आहेत. मात्र, याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप करीत तुमचा अधिकारी बेपत्ता आहे, तर त्यांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा जोपर्यंत चराठे यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असे सांगत कार्यालयातच ठिय्या मांडला. यावेळी संतप्त ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन देहारे यांनी चराठे यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश उपस्थित ग्राहकांसमोर आपल्या कार्यालयाला दिले. यावेळी कसई-दोडमार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, कोनाळ सरपंच पराशर सावंत, उपसरपंच प्रीतम पोकळे, घोटगे-वायंगणतड सरपंच संदीप नाईक, उपसरपंच प्रथमेश सावंत, साटेली- भेडशी सरपंच लखु खरवत, मोर्ले सरपंच महादेव गवस, विनीता घाडी, विजय जाधव, आनंद तळणकर, वैभव ईनामदार, हर्षद नाईक यांसह अनेक ग्राहक, ग्रामस्थ उपस्थित होते.

17 जुलैला साटेली – भेडशी ग्रामस्थांचे आंदोलन

दरम्यान सततचा वीजपुरवठा खंडित होणे, तसेच अन्य समस्यांच्या अनुशंगाने लक्ष वेधण्यासाठी बुधवारी 17 जुलै रोजी साटेली – भेडशीच्या सबस्टेशनसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच लखु खरवत यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

आवाडेत महिलांचा विजेसाठी रास्तारोको.

     साटेली – भेडशी जवळील आवाडे गावात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजपुरवठा बंद आहे. अद्यापही सुरळीत करण्यात आली नाही. शिवाय गेले काही दिवस सातत्याने कमी-जास्त दाबाने विजपुरवठा होत असल्याने अनेकांची विद्युत उपकरणे जळाली आहेत. याबाबत वीज अधिकाऱयांना माहिती देऊनही अधिकारी विजपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे विद्युत वितरण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आवाडेतील महिला व ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी साटेली – भेडशी सरपंच लखु खरवत यांसह अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Related posts: