|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ब्लेडने वार करणाऱया साजीदला सश्रम कारावास

ब्लेडने वार करणाऱया साजीदला सश्रम कारावास 

कणकवली:

कलमठ-बिडयेवाडी येथील निजामुद्दीन आसमहम्मद मंसुरी (35) यांच्यावर ब्लेडने वार करून जखमी करीत, शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा मेहुणा साजीद कादर फकीर (29, कणकवली) याला येथील दिवाणी न्यायालयाचे न्या. एस. ए. जमादार यांनी आठ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. घटनेचा तपास हवालदार बाळू कांबळे यांनी केला होता.

ही घटना 31 मे 2017 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. निजामुद्दीन यांचे कणकवली बाजारपेठेत कपडय़ाचे दुकान आहे. निजामुद्दीन दुकानात नसताना साजीद तेथे आला व शिवीगाळ करू लागला. दुकानात काम करणाऱया मुलीने निजामुद्दीन यांना फोन करून याबाबत सांगितले. निजामुद्दीन हे पत्नीसह दुकानात आले असता, साजीद दुकानाच्या कॅश काऊंटरवर बसला होता. निजामुद्दीन यांनी ‘कॅश काऊंटरवरून उठ’ असे म्हटल्याचा राग येऊन साजीदने पँटीच्या खिशातून ब्लेड काढले व निजामुद्दीन यांच्या दोन्ही हाताच्या मनगटावर, दंडावर मिळून सहा ठिकाणी वार केले. त्यानंतर तो पळून गेला. निजामुद्दीन यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दुसऱयाच दिवशी साजीदला अटक करण्यात आली होती.

साजीदवर कणकवली पोलीस ठाण्यात मारामारी, चोरी यासारखे सहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी दोन गुन्हय़ांमध्ये त्याला न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Related posts: