|Friday, February 28, 2020
You are here: Home » क्रिडा » भारतीय संघ रविवारी मायदेशी परतणार

भारतीय संघ रविवारी मायदेशी परतणार 

वृत्तसंस्था/ लंडन

उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर विश्वचषकातील आव्हान संपलेला भारतीय संघ रविवारी 14 रोजी भारताकडे प्रयाण करणार आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस झालेल्या उपांत्य लढतीत भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ‘सर्व खेळाडू विविध ठिकाणी असून शनिवारी ते सर्व लंडनमध्ये एकत्र जमणार आहेत. 14 रोजी सर्वजण एकत्रितपणे लंडनहून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत,’ असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. रविवारीच इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात जेतेपदाचा सामना होणार आहे.

सात आठवडय़ाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर भारताचे काही खेळाडू ब्रेक घेतील, असे मानले जात होते. पण आता सर्वजण एकत्रच भारतात दाखल होणार असल्याचे बीसीसीआयनेच स्पष्ट केले आहे. सर्वांच्या नजरा महेंद्रसिंग धोनीवर लागल्या आहेत. त्याच्या भविष्यातील योजनाबद्दल तो काय सांगणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल, अशी सर्वांची अटकळ आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर तो थेट रांचीकडे प्रयाण करणार असल्याचे समजते. या विश्वचषकात त्याची साधारण कामगिरी झाली असून उपांत्य सामन्यात त्याने अर्धशतक झळकवले होते. भारताकडून खेळलेला तो शेवटचा सामना होता, असे मानले जात आहे.

धोनीने आपल्या नेतृत्वाखाली दोन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत. त्यात 2007 चा टी-20 विश्वचषक व 2011 चा वनडे विश्वचषका यांचा समावेश आहे. बेस्ट फिनिशर अशी ओळख निर्माण केलेल्या धोनीला उपांत्य सामन्यात मात्र भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि त्यानंतर त्याच्यावर बरीच टीकाही झाली. कर्णधार कोहलीने मात्र त्याच्या भवितव्याबाबत बोलण्याचे टाळले. ‘त्याने निवृत्तीबाबत आम्हाला निवृत्तीविषयी काहीही बोललेले नाही,’ असे त्याने उपांत्य सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Related posts: