|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » इरासमुस-धर्मसेना अंतिम सामन्याचे पंच

इरासमुस-धर्मसेना अंतिम सामन्याचे पंच 

वृत्तसंस्था/ लंडन

लंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण आफ्रिकेचे मरायस इरासमुस विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदानी पंचांचे काम पाहणार असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यजमान इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर जेतेपदाची लढत होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर हे तिसरे पंच तर पाकचे अलीम दार चौथ्या पंचाचे काम पाहतील, असे आयसीसीने सांगितले. याशिवाय लंकेचे रंजन मदुगले सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अंतिम सामन्यासाठी नियुक्त केलेले सर्व पंच इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱया उपांत्य सामन्यातही काम पाहिले आहे. इंग्लंडने या सामन्यात 8 गडय़ांनी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली आहे.

दुसऱया सामन्यात धर्मसेना यांनी इंग्लंडचा सलामीवीर जेसॉन रॉयला वादग्रस्तरीत्या बाद दिले होते. रॉय त्यावेळी 85 धावांवर खेळत होता आणि तो शतकासमीप जात होता. कमिन्सच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाने झेलबादचे अपील केल्यावर धर्मसेना यांनी त्याला बाद देण्याचे टाळले. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सतत अपील करून त्यांच्यावर दबाव टाकल्यावर रॉय झेलबाद असल्याचा निर्णय दिला. रिप्लेमध्येही चेंडूचा बॅटला अजिबात स्पर्श झाला नसल्याचे स्पष्ट झाले. या निर्णयावर नाराज झालेल्या रॉयने पंचांना तसे सांगितलेही. पण रिव्हू संपल्यामुळे इंग्लंडला तो घेता आला नाही आणि पंचांचा निर्णय मान्य करून त्याला माघार जावे लागले होते. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल रॉयला नंतर सामना मानधनातील 30 टक्के रकमेचा दंड करण्यात आला.

 

Related posts: