|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » लॉर्ड्सवर उणीव भारताची!

लॉर्ड्सवर उणीव भारताची! 

आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये येऊन मला 43 दिवस झाले. पण, शुक्रवारी प्रथमच लॉर्ड्सवर पोहोचण्याचा योग आला. हे ऐतिहासिक स्टेडियम वसलेय लंडनमधील मध्यवर्ती भागात सेंट जॉन्स वूड परिसरात. लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी का मानली जाते, हे येथे आल्यानंतरच कळते.

तब्बल 205 वर्षांची परंपरा असलेल्या आणि जागतिक स्तरावरील सर्वात जुन्या असलेल्या लॉर्ड्सचे वैभव निव्वळ दिपवून टाकणारे. इथले पॅव्हेलियन केवळ खेळाडूंसाठी असते. तेथे अन्य कोणाला प्रवेश दिला जात नाही. पण, सुदैवाने मला   ती संधी मिळाली. 1983 साली कपिलने ज्या पॅव्हेलियनमधून झळाळता विश्वचषक उंचावला आणि 2002 साली गांगुलीने नॅटवेस्ट चषक स्पर्धेत इंग्लंडला धोबीपछाड दिल्यानंतर ज्या पॅव्हेलियनमधून टी-शर्ट हवेत भिरकावत आपला आनंद साजरा केला, त्या पॅव्हेलियनची अनुभूती घेणे हा आनंद वेगळाच.

पॅव्हेलियनपूर्वी पहिल्या मजल्यावर स्थिरावलेल्या हॉलमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू थांबत असतात आणि त्यानंतर ते आपापल्या कक्षांकडे रवाना होतात. या हॉलमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची तैलचित्रे आहेत तर पॅव्हेलियनकडे वर जात असताना सचिनचे प्रेम केलेले छायाचित्र झळकते. इथले पॅव्हेलियन म्हणजे तर लॉर्ड्सचा दीपस्तंभच!

एखादे स्टेडियम कसे असावे, याचा मूर्तिमंत दाखला म्हणजे लॉर्ड्स. आश्चर्य वाटेल. पण, लॉर्ड्समध्ये एकच मैदान अजिबात नाही. इथे एकमेकाला लागून तीन मैदाने आहेत आणि या स्टेडियमला नाव दिले गेले, त्याचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे! 1787 ते 1814 या कालावधीत आता जिथे डॉर्सेट स्क्वेअर आहे, तिथे पहिले मैदान होते. त्यानंतर 1811 ते 1813 या कालावधीत लॉर्ड्स मिडल ग्राऊंड उभारले गेले तर त्यानंतर 250 यार्डाचे सध्याचे लॉर्ड्स ग्राऊंड उभारले गेले.

2014 मध्ये या मैदानाने 200 वर्षे पूर्ण केली, त्यावेळी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील एमसीसी इलेव्हन व शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील शेष विश्व संघात 50 षटकांचा सामना खेळवला गेला. अतिशय रचनात्मक बांधणी आणि विविध वैशिष्टय़ांसह नटलेले लॉर्ड्स क्रिकेट जगताचा अर्थातच सर्वात सुंदर ठेवा. पण, जी टीम इंडिया इथे हवी होती, ती मात्र उपांत्य फेरीतच गारद झालीय आणि संघ अद्याप मँचेस्टरमध्येच आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत जो घात झाला, तो या संघाला, चाहत्यांना आणि भारतीय क्रिकेट वर्तुळाला पुढील बऱयाच कालावधीपर्यंत विसरता नाही येणार. संघ सध्या विमानाची तिकिटे मिळत नसल्याने मँचेस्टरमध्ये अडकून पडला आहे आणि याला कारण देखील या संघावर प्रेम करणारे चाहते, जे मायदेशी परतण्यासाठी मिळालेल्या तिकिटांवर यापूर्वीच तुटून पडले आहेत.

या पराभवामुळे आता संघातील दुफळी देखील बाहेर पडते आहे. कर्णधार विराट कोहलीला ऋषभ पंत नको होता. पण, शास्त्राRच्या आग्रहाखातर त्याला घेतले गेले आणि न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाच्या उपांत्य लढतीत ऋषभ पंत अपेक्षा पूर्ण करु शकला नाही, त्यावेळी विराटला आपला रोष व्यक्त करण्याची आयती संधी मिळाली, असेही मानले जाते. पण, भारतीय संघ या विश्वचषकासाठी इंग्लंडला दाखल झाला, त्यावेळी चौथ्या स्थानी विजय शंकरला पसंती दिली गेली आणि त्याचवेळी एक प्रश्न ओघाने उपस्थित झाला होता की, अम्बाती रायुडूचा का विचार झाला नाही?

याच रायुडूने ही स्पर्धा सुरु असताना मध्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आणि कर्णधार विराट कोहलीने रायुडू अतिशय ‘महान खेळाडू’ आहे, अशी टिपणी केली, त्यावेळी देखील उभयतात किती ‘स्नेह’ असावा, हे दिसून आले होते कदाचित. अर्थात, भारतीय संघ आता फक्त शास्त्री व विराट कोहली यांच्या एकतर्फी धोरणाने चालतो, हे आता लपून राहिलेले नाही. प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय हे कोहलीचे चाहते आहेत, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद कोणत्याच किमतीवर शास्त्राr व कोहलीचा विरोध करु शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

केएल राहुल कितीही खराब फॉर्ममध्ये असला तरी 15 सदस्यीय संघात तो असणारच, कोणी जखमी झाले की, कोणत्या ना कोणत्या रितीने, कोणत्या तरी ठिकाणी त्याला खेळवले जाईलच आणि कुलदीप यादव व चहल यांच्यातील कोणीही खराब गोलंदाजी केली तरी कुलदीपलाच वगळले जाईल, ही अलीकडची परंपरा झाली आहे, असे सध्या मानले जाते. याचे कारण असे मानले जाते की, चहल आयपीएल स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघातून खेळतो!

प्रशिक्षक रवी शास्त्री व भरत अरुण यांच्या मैत्रीचे अनेक किस्से चर्चेत रहात आले आहेत आणि विराट या दोघांचा शब्द ओलांडत नाही. पण, अर्थातच नुकसान संघाचे होतेय. ते टाळायचे असेल तर नव्याने सुरुवात करायला हवी. कारण, उद्या फायनलमध्ये पहिला चेंडू टाकला जाईल, त्यावेळी पहिली उणीव भारताचीच जाणवेल.

Related posts: