|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घोडगे-सोनवडे घाटरस्त्यासाठी खासदार राऊत यांचा पाठपुरावा

घोडगे-सोनवडे घाटरस्त्यासाठी खासदार राऊत यांचा पाठपुरावा 

नागेंद्र परब यांची माहिती

प्रतिनिधी / कुडाळ:

घोडगे-सोनवडे घाटरस्त्याची फाईल वन्यजीव संस्थेच्या शेऱयामुळे 2014 पूर्वी स्थगित ठेवण्यात आली होती. विनायक राऊत खासदार झाल्यानंतर घोडगे घाटरस्ता प्रकरणी आवश्यक असणाऱया सुनावण्या, विविध परवानग्या, वन्यजीव विभागाच्या ना-हरकत, वनविभागाच्या सर्व परवानग्या मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मंत्रालय ते दिल्ली अशा अनेक स्तरावर गेली पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ुट (डेहराडून) येथे जाऊन प्रत्यक्ष अधिकाऱयांशी चर्चा करून परवानगी मिळविली. याकामी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, आमदार वैभव नाईक, आमदार प्रकाश आबिटकर यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे आता घोडगे घाटमार्ग मार्गी लागत आहे, असे शिवसेना गटनेते तथा जि. प. सदस्य नागेंद परब यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

घोडगे-सोनवडे घाटरस्त्यासाठी तेथील ग्रामस्थ वारंवार आंदोलन करत होते. त्यामुळे राऊत यांनी या रस्त्यासाठी प्राधान्य देत आवश्यक परवानग्या मिळविल्या. संबंधित खात्याचे अधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यासमवेत संपूर्ण घाटरस्ता पायी पार केला. वारंवार पाठपुरावा करत आवश्यक असणाऱया परवानग्या मिळविल्या. या सर्व प्रकरणी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य केले, असे परब यांनी म्हटले आहे.

परंतु घाटरस्त्याच्या पुढील कार्यवाहीसंदर्भात काही अडचणी निर्माण केल्या जात होत्या. त्यामुळे या रस्ताप्रकरणी तात्काळ कार्यवाही सुरू होऊन घाटरस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, यासाठी खासदार राऊत, आमदार नाईक व आमदार आबिटकर यांनी 28 जूनला चंदकांत पाटील यांना संयुक्त पत्र देऊन संबंधित सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी केली. त्याला अनुसरून 16 जुलैला पाटील यांनी मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक बोलावली आहे, असे परब यांनी म्हटले आहे. त्यामुळे बैठकीत योग्य निर्णय होऊन प्रत्यक्ष घाटरस्त्याचे काम सुरू होण्यासंदर्भात तेथील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Related posts: