|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हायवे कर्मचारी-युवकांत तुंबळ हाणामारी

हायवे कर्मचारी-युवकांत तुंबळ हाणामारी 

कासार्डेतील घटना : तळेरेचा युवक गंभीर : दांडे, शिगा, गावठी कट्टय़ाचाही वापर

परस्परविरोधी तक्रारी दाखल

कणकवली:

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱया केसीसी बिल्डकॉन कंपनीचे कर्मचारी व काही ग्रामस्थ यांच्यात कासार्डे जांभूळवाडी येथे तुंबळ हाणामारी झाली. यात लाकडी दांडे, शिगाच नव्हे, तर गावठी कट्टाही डोक्याला लावून धमकावण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हाणामारीत दोन्ही गटांतील काहीजण जखमी झाले. यात तळेरे येथील प्रेषित चंद्रशेखर महाडिक (24) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना केसीसी बिल्डकॉन बेसकॅम्पच्या आवारात शुक्रवारी रात्री 11.30 वा. सुमारास घडली. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.

याबाबत केसीसी बिल्डकॉन कंपनीचे एच. आर. असिस्टंट ऑफिसर आदित्य प्रताप सिंग (24, मूळ उत्तरप्रदेश व सध्या रा. कासार्डे जांभूळवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, प्रथमेश उर्फ सनी रणजीत पाताडे (25), अजिंक्य रणजित पाताडे (21, दोन्ही रा. कासार्डे), प्रेषित चंद्रशेखर महाडिक (24, तळेरे), शाहूर विलास राठोड (22), राहूल विलास राठोड (30, दोघेही मूळ उस्मानाबाद व सध्या रा. कासार्डे), अनिल अशोक साळकर (28, चाफेड, देवगड), प्रणय दीपक देवरुखकर (24, कासार्डे) या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी प्रणय वगळता अन्य सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

तर प्रेषित चंद्रशेखर महाडिक (24, तळेरे) यांच्या फिर्यादीनुसार गुरमीत सिंग, ओंपाल मलिक आदी दहा ते बाराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयितांना सायंकाळी उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. अटकेतील संशयितांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कॅम्पमध्ये शिरले स्थानिक संशयित

केसीसीचे आदित्य प्रताप सिंग यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री 11.20 वा. सुमारास आदित्य हे केसीसी बिल्डकॉन बेस कॅम्पच्या रिसेप्शन रुममध्ये बसले असता तेथील वॉचमन त्यांच्याकडे आला. सनी पाताडे व आठ-दहा लोक आले असून ते गुरमीत सिंग कुठे आहे?, असे विचारत असल्याचे वॉचमनने सांगितले. पुढे पाताडे व अन्य संशयित हे आदित्य यांच्याकडे आले. ‘तुमच्यामुळे रस्त्याला खड्डे पडले. त्यामुळे माझ्या गाडीला लागले’ असे म्हणत संशयित केसीसीच्या वर्कशॉपकडे निघून गेले.

मारहाण करीत गावठी कट्टाही..

मात्र, काही वेळातच वर्कशॉपजळ असलेल्या कामगारांची आरडाओरड ऐकू आली. या कामगारांना मारहाण करून हातात दांडे व लोखंडी रॉड घेऊन संशयित पुन्हा आदित्य यांच्याकडे आले. त्यांनी आदित्य यांना हाताच्या ठोशाने, पायावर लोखंडी रॉडने तसेच दोन खोल्यांमध्ये विश्रांती घेत असलेल्या कामगारांनाही दांडा, रॉडने मारहाण केली. यात एका कामगाराचा मोबाईल तोडला असून दोघांचे मोबाईल हिसकावले. यावेळी दाढी असलेल्या संशयिताने कामगार ओंपाल मलिक यांना डोकीला गावठी कट्टा लावून ‘तुला आता मारून टाकतो’ असे धमकावले. पुढे संशयित कार (एमएच 07 एजे 666) व ओपन जीपने ते निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

खड्डय़ांबाबत विचारणा केली, पण..

प्रेषित चंद्रशेखर महाडिक (24, तळेरे) याच्या फिर्यादीनुसार, महाडिक हे अन्य दोन पार्टनरसह कासार्डे दक्षिण गावठण या भागात वाळू उत्खनन व विक्रीचा व्यवसाय करतात. याच रस्त्यावर केसीसी कंपनीचा बेस कॅम्प असून केसीसीच्या गाडय़ा या रस्त्यावर ये-जा करीत असतात. या रस्त्यावर भरपूर खड्डे पडले आहेत. याबाबत कंपनीचे अधिकारी गुरमीत सिंग व अन्य कर्मचाऱयांना खड्डे भरून देण्याबाबत प्रेषित यांनी वारंवार सांगितले होते. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रेषित, प्रथमेश पाताडे, साहू राठोड हे प्रेषित यांच्या हय़ुंडाई कारने (एमएच 43 बीके 666) जात असताना केसीसी बेस कॅम्पच्या समोरील रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये कार आदळली. प्रेषित यांनी गुरमीत सिंग यांना फोनद्वारे सदरबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही. मग त्यांनी तेथील वॉचमनला ‘तुमचे कोण इंजिनियर आहेत त्यांना बोलावून सांगा की, सदरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरून घ्या’ असे सांगितले. मात्र, वॉचमनने कोणालाही काही सांगितले नाही.

केसीसी कर्मचाऱयांनी मारहाण केल्याचा आरोप

थोडय़ा वेळाने कॅम्पमधील काहींनी प्रेषित व सोबतच्यांना आतून ‘हिंमत है तो अंदर आ जाओ’ असे म्हणत शिविगाळ केली. त्यावर प्रेषितसह तिघे कॅम्पच्या आत गेले असता गुरमीत सिंग, ओंपाल मलिक आदी दहा ते बाराजणांनी त्यांना लोखंडी सळय़ा व लाकडी दांडय़ाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील संशयित ओंपाल मलिक याने ‘अभी आए हो हमारे इलाके में। अभी देखते है जिंदा कैसे जाते हो। एक एक को जिंदा गाड देते है।’ असे म्हणत हातातील लाकडी दांडा प्रेषित यांच्या डोकीवर, हातावर मारला. परिणामी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र, तेथून वैभववाडी सरकारी रुग्णालय व ते बंद असल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर बारा टाके घालण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गुह्यातील कार जप्त

घटनेची माहिती समजताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत केसीसीचे आदित्य सिंग यांच्या फिर्यादामधील संशयितांना शनिवारी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. त्यांनी वापरलेल्या दोन चारचाकीही जप्त करण्यात आल्या. दुपारच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावर काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

Related posts: