|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » सिफान हसनचा नवा विश्वविक्रम

सिफान हसनचा नवा विश्वविक्रम 

वृत्तसंस्था/ मोनॅको

येथे झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत हॉलंडची महिला धावपटू 23 वर्षीय सिफान हसनने महिलांच्या एक मैल पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत शुक्रवारी नवा विश्वविक्रम केला. या स्पर्धेत अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन सर्वात वेगवान धावपटू ठरला.

महिलांच्या एक मैल पल्ल्याच्या शर्यतीमध्ये हॉलंडच्या सिफान हसनने 4 मिनिटे, 12.33 सेकंदाचा अवधी घेत नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक मिळविले. हसनने हे जेतेपद गेल्या महिन्यात कर्करोगाने निधन झालेल्या अमेरिकेच्या माजी धावपटू गॅबे ग्रुनवेल्डच्या स्मृतीला अर्पण केले. 32 वर्षीय अमेरिकन महिला धावपटू गुनवेल्डचे गेल्या महिन्यात कर्करोगाने निधन झाले होते. या क्रीडा प्रकारात 1996 साली रशियाच्या स्वेतलाना मास्टरकोव्हाने नोंदविलेला 4 मिनिटे, 12.56 सेकंदाचा विश्वविक्रम हसनने येथील स्पर्धेत मागे टाकला. वयाच्या 15 व्या वर्षी हसन इथिओपियातून हॉलंडमध्ये निर्वासित म्हणून दाखल झाली होती. येत्या सप्टेंबरमध्ये डोहा येथे होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत 1500 आणि 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे हसनने आपला मनोदय व्यक्त केला.

या स्पर्धेत पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत निजेल ऍमोसने 1 मिनिट, 41.89 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविताना वैयक्तिक सर्वात जलद वेळ नोंदविली. केनियाच्या डेव्हिड रूदिशाने 1 मिनिट, 40.91 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने 9.91 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान पटकाविले. या स्पर्धेत गॅटलीन सर्वात वेगवान धावपटू ठरला. अमेरिकेच्या नोहा लिलेसने 9.92 सेकंदासह दुसरे तर माईक रॉजर्सने 10.01 सेकंदासह तिसरे स्थान मिळविले. 100 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत अमेरिकेच्या कॅन्डे हॅरीसनने 12.43 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. 200 मी. धावण्याची शर्यत शॉने मिलर यबोने जिंकताना 22.09 सेकंदाचा अवधी घेतला.

Related posts: