|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सिमोना हॅलेपचे पहिले विम्बल्डन जेतेपद

सिमोना हॅलेपचे पहिले विम्बल्डन जेतेपद 

सेरेनाचे 24 वे जेतेपद मिळविण्याचे  स्वप्न उद्ध्वस्त, नदालला हरवून फेडरर अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ लंडन

रोमानियाच्या सिमोना हॅलेपने कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळविताना 23 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे 24 वे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळवित विम्बल्डन स्पर्धा जिंकली. पुरुष एकेरीत शुक्रवारी उशिरा झालेल्या उपांत्य सामन्यात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनेही स्पेनच्या राफेल नदालचा स्वप्नभंग करून अंतिम फेरी गाठली. कनिष्ठ मुलींच्या एकेरीत फिनलंडच्या दारिया स्निगुरने जेतेपद पटकावले.

हॅलेपने जबरदस्त खेळ करीत सेरेनाचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विम्बल्डनचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. 2-4 असे पिछाडीवर पडलेल्या सेरेनाने चुरशीच्या गेममध्ये तीन बिनतोड सर्व्हिस केल्या आणि दोन गेमपॉईंटही वाचविले. पण हॅलेपने बेसलाईनवर शानदार खेळ करीत दुसरा ब्रेकपॉईंट मिळविला आणि आपल्या सर्व्हिसवर तिने सामना संपविला. केवळ 55 मिनिटांत तिने हा सामना संपविला. विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी ती रोमानियाची पहिली महिला टेनिसपटू आहे. सेरेना मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील होती. पण यावेळीही तिला अपयश आल्याने आता तिला अमेरिकन ग्रँडस्लॅमची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कनिष्ठ मुलींच्या एकेरीत फिनलंडच्या दारिया स्निगुरने अमेरिकेच्या ऍलेक्सा नोएलचा पराभव करून जेतेपद पटकावले.

फेडररची नदालवर बाजी

पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत फेडरर व नदाल या दोन दिग्गजांच्या मुकाबल्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आजवर नदालने त्यावर बरेच वर्चस्व गाजविले होते. पण 11 वर्षांच्या खंडानंतर झालेल्या या लढतीत फेडररनेच बाजी मारत 12 व्या वेळी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 37 वर्षीय फेडररने चुरशीची झालेली ही लढत 7-6 (7-1), 1-6, 6-3, 6-4 अशी जिंकून नदालचे आव्हान संपुष्टात आणले. या दोघांत झालेली ही एकूण 40 वी लढत होती. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची फेडररची ही 31 वी वेळ असून जेतेपदासाठी रविवारी त्याची लढत विद्यमान विजेत्या सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोविचशी होईल. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा वयस्कर खेळाडू आहे. यापूर्वी 39 वर्षीय केन रोजवालने 1974 मध्ये विम्बल्डन व अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरी भाग घेतला होता.

ज्योकोविचविरुद्ध मात्र त्याचे रेकॉर्ड आशादायक नसल्याने रविवारी फेडररला कारकिर्दीतील 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी कठोर मुकाबला करावा लागणार आहे. आतापर्यंत ज्योकोविचने 25 तर फेडररने 22 लढती जिंकल्या आहेत. ज्योकोविचने 23 व्या मानांकित स्पेनच्या रॉबर्टो ऍगटचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. फेडरर-नदाल लढतीला 2008 च्या अंतिम लढतीची सर आली नसली तरी फेडररला विजय मिळविण्यासाठी पाच मॅचपॉईंट्स वाचवावे लागले. गेल्या महिन्यातच पेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नदालने फेडररचा एकतर्फी धुव्वा उडविला होता. फेडररने या लढतीत एकूण 14 बिनतोड सर्व्हिस केल्या तर 51 विजयी फटके मारले. ज्योकोविचने ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली असून आणखी एक विम्बल्डन जेतेपद मिळविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.