|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अहिरवाडीनजीक अपघातात एक ठार

अहिरवाडीनजीक अपघातात एक ठार 

वार्ताहर/ आष्टा

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर आहिरवाडी फाटय़ाजवळ मोटारसायकल आणि बोअर मारण्याचा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात भाटवाडी येथील एक जण जागीच ठार झाला. तर दोघेजण जखमी झाले. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.

महादेव शंकर गायकवाड (वय 60) राहणार भाटवाडी, ता. वाळवा असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मयताची सून आरती अभिजित गायकवाड, दीड वर्षाचा नातू राजवीर गायकवाड जखमी झाले. त्यांच्यावर इस्लामपूर येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत आष्टा पोलीस ठाण्याकडून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, महादेव गायकवाड हे होंडा ड्रीम मोटारसायकलवरून  (क्रमांक- एम.एच.10-सी.ई-9076) आष्टय़ाच्या दिशेने जात असताना आष्टय़ाहून इस्लामपूरच्या जात असलेल्या बोअर मारण्याचा ट्रकशी (क्रमांक-टी.एन.52-डी-4574) समोरासमोर धडक झाली. या धडकेत मोटारसायकलस्वार महादेव गायकवाड जागेवरच ठार झाले. तर त्यांची सून आरती गायकवाड व नातू राजवीर गायकवाड हे जखमी झाले. जखमींना तातडीने इस्लामपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले. महादेव गायकवाड यांनी हेल्मेट घातले होते. अपघातात त्यांचे हेल्मेट फुटले होते. डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. हेल्मेट घातले असतानाही गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी नागरिकांनी तसेच प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार काकतकर तपास करत आहेत.

Related posts: