|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्ह नियोजन समितीत 313 कोटीच्या आराखडयाला मंजुरी

जिल्ह नियोजन समितीत 313 कोटीच्या आराखडयाला मंजुरी 

अखर्चित निधी मार्च खर्च कराःपालकमंत्री सुभाष देशमुख

प्रतिनिधी/ सांगली

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयाच्या चालू आर्थीक वर्षाच्या 313 कोटीच्या वार्षिक आराखडयाला मंजुरी देण्यात आली. अखर्चित निधी संबंधित विभागांनी मार्च अखेर पर्यंत  खर्च करावा असे निर्देश जिह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, कृषि राज्य मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आ. शिवाजीराव नाईक, आ. मोहनराव कदम, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुमनताई पाटील, आ. विश्वजीत कदम, आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह समितीचे सदस्य-सदस्या, खातेप्रमुख उपस्थित होते.

सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखडय़ांतर्गत सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर 224 कोटी, 18 लाख रुपये निधी प्राप्त झाला. त्यापैकी मार्चअखेर बीडीएस नुसार 223 कोटी 45 लाख रुपये निधी खर्च झाला. मात्र प्रत्यक्षात खर्च झालेला निधी 106 कोटी 26 लाख रुपये आहे. तसेच, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख रुपये निधी मंजूर झाला. त्यापैकी मार्चअखेर बीडीएसनुसार 68 कोटी, 50 लाख रुपये निधी खर्च झाला. मात्र, प्रत्यक्षात केवळ 20 कोटी 33 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना कार्यक्रमांतर्गत मंजूर व प्राप्त सर्व निधी बीडीएसनुसार आणि प्रत्यक्षात खर्च झाला आहे. त्यामुळे ज्या सर्व विभागांचा प्रत्यक्षातील निधी अखर्चित राहिला आहे, त्यांनी तो खर्च करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश बैठकीत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

सामान्य नागरिक आणि शेतकरी यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी तत्पर असावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती सदस्यांशी समन्वय ठेवून आरोग्य, रस्ते, पाणी, शिक्षण, वीजबिल यासारख्या मूलभूत गरजांबाबतचे प्रश्न सोडवावेत. त्यासाठी बैठका घ्याव्यात. पाठपुरावा करावा. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत खातेदारांना सभासद करून घ्यावे. तसेच, पीकविम्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. तसेच सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत काय कार्यवाही केली, त्याबाबत लेखी उत्तर दयावे. जिह्यातून महावितरण विभागाबाबत सदस्यांनी जनतेच्या समस्या मांडल्या. अधिकाऱयांनी या समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही करावी. यावेळी चारा छावण्या व त्यांची देयके, नळपाणीपुरवठा, सांगली तासगाव बाह्यवळण रस्ता, डाळिंब, द्राक्षबागेसाठी बारमाही पीकविमा, उपसा सिंचन योजनांचे आवर्तन व वीजबिल, डोंगराई, चौरंगीनाथ पर्यटनस्थळ, शासकीय रूग्णालय, सांगली येथे सोयीसुविधा, शेतीपंप, ग्रामीण रूग्णालय, राष्ट्रीय पेयजल योजना आदिंबाबत समिती सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच, बहिर्जी नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग. दि. माडगूळकर, बालगंधर्व, गणपतराव आंदळकर यांच्या स्मारकाबाबत समिती सदस्यांनी सूचना केल्या.

प्रारंभी दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख आणि विलासराव शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांनी बैठकीची माहिती दिली. या बैठकीस माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, समिती सदस्य आणि सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related posts: