|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लोकमान्य एज्युकेशनचे कार्य कौतुकास्पद!

लोकमान्य एज्युकेशनचे कार्य कौतुकास्पद! 

अध्यक्ष किरण ठाकुर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

प्रतिनिधी / सावंतवाडी:

जिल्हय़ात लोकमान्य एज्युकेशनमार्फत सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असून अशा शैक्षणिक उपक्रमांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कोकण विभागाच्या लोकमान्य एज्युकेशनमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आणि नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर व मुख्यमंत्र्याचे माजी जनसंपर्क अधिकारी व सचिव यांनी मुंबई येथील सहय़ाद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

जिल्हय़ात पर्यटन व फलोद्यानाला फार मोठा वाव आहे. या क्षेत्रात भविष्यात फार मोठे मनुष्यबळ लागणार आहे. यासाठी कृषी, फलोद्यान, मत्स्य, पर्यटन या क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित अभ्यास या जिल्हय़ात सुरू करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

नाथ पै विद्यापीठ उभारणार

जिल्हय़ाचे माजी खासदार संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या नावाने जिल्हय़ात अद्ययावत असे विद्यापीठ संस्थेमार्फत उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी दिली. सध्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविणारे हॉटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट स्टडीज, बी. एड. तसेच मुक्त विद्यापीठाचे चार अभ्यासक्रम लोकमान्य एज्युकेशन चालवित असून संस्थेला शिपिंग कॉलेज उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. भविष्यात कृषी, फलोद्यानावर आधारित अभ्यासक्रम संस्थेमार्फत सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना यापुढे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मोठय़ा शहरात जाऊ लागू नये, यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून हाती घेण्यात आल्याची माहिती ठाकुर यांनी दिली.

यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी ‘तरुण भारत’ मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक नरेंद्र कोठेकर, माजी आमदार बी. आय. पाटील उपस्थित होते.

Related posts: