|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » त्याचे स्वप्न बडा मूर्तीकार होण्याचे…

त्याचे स्वप्न बडा मूर्तीकार होण्याचे… 

प्रसाद सु. प्रभू /बेळगाव :

मूर्तीकार व्हायचे हा एकच ध्यास त्याने वयाच्या तिसऱया वर्षांपासून पकडला आहे. दरवषी गणेशोत्सवात किमान एक तरी गणपती तो साकारत आला आहे. यंदा तो पाचवीत आहे आणि त्याचे वय आहे अवघे 11 वर्षे. मात्र या ध्यासापोटी 20 गणेशमूर्ती बनवून त्याने आपल्या अंगभूत कलेला तर न्याय दिलाच. शिवाय त्या मूर्तींची विक्री करुन त्याच्यातील चिमुकला उद्योजकही घडू लागला आहे. मोठा होवून बडा मूर्तीकार होण्याचे स्वप्न घेऊन त्याची वाटचाल सुरु आहे.

गोंधळी गल्लीत राहणाऱया सौरभ संतोष माळी याच्या या धडपडीमुळे सध्या तो लक्षवेधी ठरला आहे. तीन वर्षांचा होता तेंव्हापासूनच घेतलेल्या ध्यासामुळे शाळेतून बाहेर पडल्यावर आसपासच्या मूर्तीकारांच्या कार्यशाळा हेच त्याचे विरंगुळय़ाचे ठिकाण. सध्या बकरी मंडई येथील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 29 मध्ये तो शिकतोय. इतर मूर्तीकारांप्रमाणेच आपणही गणेशमूर्ती बनवायचीच हे स्वप्न ठेवून त्याने चक्क 20 गणपती बाप्पा साकारले आहेत. चिमुकले हात आणि त्यातुन फिरणारा कुंचला घेवून त्या बाप्पांना रंगविले आहे. त्याच्या त्या धडपडीची जाणीव ठेवून अनेकांनी त्याने बनविलेल्या या मूर्ती खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे यंदा सौरभने बनविलेला बाप्पा अनेकांच्या आकर्षक आराशित प्रति÷ापीत होवू शकणार आहे.

आजी-आजोबा, वडील आणि सौरभ असे चौघांचेच कुटुंब आहे. लहानपणीच आई देवाघरी गेली, असे तो सांगतो. आईची आठवण आली की मूर्ती बनवायला घेतो आणि एक आकर्षक मूर्ती तयार होते, असे तो सांगतो. गणपतीबरोबरच विठ्ठल, शंकर, ब्रम्हदेव, लक्ष्मी यांच्या मूर्ती बनवायला त्याला आवडतात. पुस्तकाच्या दुकानातून देव, देवतांची छायाचित्रे गोळा करुन त्या छायाचित्राप्रमाणे मूर्ती करण्याचा प्रयत्न तो करीत राहतो. यंदा गणपतीची पिग्गी बँक उभी कापून त्यामध्ये शाडू भरुन त्याने आकर्षक असे आपल्या सारखेच चिमुकले बाप्पा बनविले असून त्यांना मोठी मागणी आहे.

Related posts: