|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारी घाटरस्ता 17 ऑगस्टला वाहतुकीस खुला

तिलारी घाटरस्ता 17 ऑगस्टला वाहतुकीस खुला 

वार्ताहर / दोडामार्ग:

 महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांना जोडणारा तिलारी घाट (रामघाट) काही दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळला होता. घाटातील 30 मीटर लांबीचा भाग वाहून गेल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (चंदगड) उपअभियंता यांनी घाटाची पाहणी करून 17 ऑगस्टला तिलारी घाट पुन्हा वाहतुकीस पूर्ववत खुला होईल, असे पत्राद्वारे कळविले आहे.

गेल्या वर्षीच बांधकाम विभाग कोल्हापुरकडे हा घाटरस्ता वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. जवळपास तीन कोटी रुपये खर्ची घालून घाटातील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. तर चार महिन्यापूर्वी संरक्षक कठडय़ांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे घाटातील वाहतूक वर्षभरापूर्वी वाढली होती. जवळचा रस्ता असल्याने बेळगाव, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी जाणारी वाहतूक याच घाटरस्त्यातून होत होती. चंदगड, बेळगाव, राधानगरी, कोल्हापूर आगाराच्या गाडय़ा याच मार्गाने धावतात. खाजगी वाहतुकही मोठय़ा प्रमाणात होती. शिवाय आंबोली घाटाला पर्याय म्हणून तिलारी घाटाला पाहिले जाते.

 दोडामार्ग, गोवा आदी भागातील हा तिलारी घाटमार्ग बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचा होता. मात्र, तो गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीस बंद केल्यामुळे या भागातील प्रवाशांचे हाल झाले होते. तसेच सदर घाटरस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुरू होत असल्याने व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, नियोजीत तारखेलाच बांधकाम विभागाने घाट सुरू करावा, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांतून होत आहे.

Related posts: