|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ब्रिटनची तेलवाहू नौका इराणच्या ताब्यात

ब्रिटनची तेलवाहू नौका इराणच्या ताब्यात 

होर्मूझ सामुद्रधुनीतील प्रकार : चालकदलाचे 18 भारतीय सदस्य अडचणीत

वृत्तसंस्था/ लंडन 

 होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने शनिवारी ब्रिटनची एक तेलवाहू नौका जप्त केली आहे. या घटनेनंतर पाश्चिमात्य देश आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनी ब्रिटनचा ध्वज असलेल्या ‘स्टेना इमपेरो’ला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातच हेलिकॉप्टर्स आणि चार नौकांच्या मदतीने घेरत स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे संबंधित कंपनीने म्हटले आहे. या तेलवाहू नौकेत एकूण 23 जण कार्यरत होते. यात 18 भारतीयांसह रशिया, लाटव्हिया आणि फिलिपाईन्सचे नागरिकही सामील आहेत.

इराण रेव्हॉल्युशनरी गार्डने स्वतःच्या संकेतस्थळावर तेलवाहू नौका जप्त केल्याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गाचा कायदा न पाळल्याने ही नौका जप्त करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. संबंधित तेलवाहू नौकेला इराणच्या बंदरावर ठेवले जाईल.

गंभीर परिणाम होतील : ब्रिटन

ब्रिटनने हे प्रकरण गांभीर्याने घेत इराणला इशारा दिला आहे. इराणने नौकेची लवकर  सुटका न केल्यास त्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. हे प्रकरण सैन्यपद्धतीच्या ऐवजी मुत्सद्यांच्या माध्यमातून निकालात काढले जाणार आहे. इराणमधील राजदूत सातत्याने विदेश मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचे ब्रिटनचे विदेशमंत्री जेरेमी हंट यांनी सांगितले आहे. ब्रिटिश सरकारची आपत्कालीन समिती ‘कोब्रा’ने या घटनेवर चर्चेसाठी बैठक आयोजित केली आहे. नौका कंपनीच्या प्रवक्त्यांनी चालकदलाचे सर्व सदस्य सुखरुप असल्याचे स्पष्ट केले
आहे.

इराणचा ड्रोन नष्ट

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तैनात अमेरिकेच्या युद्धनौकेने शुक्रवारी इराणचा एक ड्रोन उद्ध्वस्त केला होता. युएसएस बॉक्सरने संबंधित ड्रोन 918 मीटरपेक्षा कमी अंतरावर पोहोचल्यावर बचावाच्या उद्देशाने ही कारवाई केली होती. ड्रोनमुळे नौका आणि चालकदलाला धोका निर्माण झाला होता असा दावा अमेरिकेने केला आहे. तर इराणने स्वतःच्या ड्रोनचे नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे.

इराणची नौका ब्रिटनच्या ताब्यात

ब्रिटन आणि इराण यांच्यातील तणाव चालू महिन्याच्या प्रारंभी वाढला होता. ब्रिटिश रॉयल मरीनने युरोपीय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इराणची ‘ग्रेस’ ही तेलवाहू नौका जिब्राल्टर येथे ताब्यात घेतली होती. ही नौका सीरियातून कच्च्या तेलाची वाहतूक करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर इराणनेही ब्रिटनची तेलवाहू नौका जप्त करण्याची धमकी दिली होती. 10 जुलै रोजी काही इराणी नौकांनी ब्रिटनच्या तेलवाहू नौकेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ब्रिटिश युद्धनौका सोबत असल्याने इराणचा हा प्रयत्न अपयशी ठरला होता.

Related posts: