|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बोरिस जॉन्सन ब्रिटनचे पंतप्रधान

बोरिस जॉन्सन ब्रिटनचे पंतप्रधान 

ब्रेक्झिटचे कट्टर समर्थक अशी ओळख : युरोपीय महासंघापासून ब्रिटनला विभक्त करण्याचे मोठे आव्हान

वृत्तसंस्था/ लंडन

 माजी विदेश मंत्री बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जॉन्सन यांनी विद्यमान विदेशमंत्री जेरेमी हंट यांना पराभूत केले आहे. ब्रिटनच्या सत्तारुढ कॉन्झर्वेटिव्ह पार्टीत नेतेपदासाठी झालेल्या निवडणुकीत जॉन्सन यांना 92,153 मते प्राप्त झाली तर हंट यांना केवळ 46,656 मतांवर समाधान मानावे लागले. पक्षाच्या एकूण 1,59,320 सदस्यांपैकी 87.4 टक्के जणांनी मतदान केले होते.

मागील महिन्यात देशाच्या दुसऱया महिला पंतप्रधान थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटन एका नव्या नेत्याच्या शोधात होता. थेरेसा यांनी 7 जून रोजी कॉन्झर्वेटिव्ह पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर या सर्वोच्च पदाकरता अधिकृत शर्यत सुरू झाली होती. जॉन्सन यांची मंगळवारी भावी पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. पंतप्रधान या नात्याने ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करण्यास वारंवार अपयश आल्याने थेरेसा यांना पदाचा त्याग करावा लागला होता.

बेक्झिटची गुंतागुंत

अलेक्झांडर बोरिस दे फेफेल जॉन्सन यांना बोरिस जॉन्सन या नावानेही ओळखले जाते. पंतप्रधानपद स्वीकारल्यावर जॉन्सन 10 डाउनिंग स्ट्रीटमध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान बेक्झिटचा वाद संपविण्याचेच असणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही स्थितीत बेक्झिटला मूर्त रुप देणार असल्याची घोषणा जॉन्सन यांनी मागील महिन्यात केली होती.

अर्थव्यवस्थेला फटका?

कुठल्याही कराराशिवाय युरोपीय महासंघाशी असलेले नाते संपुष्टात आणण्याची त्यांची मनीषा आहे. पण त्यांचा हा निर्णय ब्रिटिश अर्थव्यवस्थेकरता मोठा झटका ठरू शकतो. या निर्णयानंतर ब्रिटन एका झटक्यात जगाच्या एका शक्तिशाली आर्थिक संघटनेतून बाहेर पडणार आहे. जगाची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनवर याचा व्यापक प्रभाव पडणार आहे. जॉन्सन यांनी अशा स्वरुपाचे पाऊल उचलल्यास जागतिक आर्थिक सत्ता म्हणून असलेली ब्रिटनची स्थिती कमकुवत होणार असल्याचे टीकाकारांचे मानणे आहे.

पक्षांतर्गत विरोध

55 वर्षीय जॉन्सन हे बेक्झिटचे प्रबळ समर्थक असून त्याकरता त्यांनी जोरदार मोहीमही राबविली होती. विद्यमान पंतप्रधान थेरेसा मे आता महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना स्वतःचा राजीनामा सादर करण्यापूर्वी हाउस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधान या नात्याने अंतिमवेळा प्रश्नांना सामोऱया जातील. जॉन्सन यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यापूर्वीच पक्षातंर्गत विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. चान्सलर फिलिप हॅमंड समवेत अनेक प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांनी जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा राजीनामा देऊ असे स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अभिनंदन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोरिस यांचे अभिनंदन केले आहे. बोरिस एक महान नेते ठरतील. आम्ही दोघेही आता मिळून बेक्झिटवर काम करणार आहोत. माझ्याकडून जॉन्सन यांना पूर्ण समर्थन मिळणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य असल्याचे बोलले जाते.

Related posts: