|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गणेशमूर्तींचे 60 टक्के कामे पूर्ण

गणेशमूर्तींचे 60 टक्के कामे पूर्ण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गणेशोत्सव एक महिना 12 दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील धोत्री गल्ली, गंगावेश, दत्त गल्ली, शाहूपुरी, संत गोरा कुंभार वसाहतीसह (बापट पॅम्प) कळंबा येथील कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाने गती घेतली आहे. मूर्तीकारांचे सारे कुटूंबीय गणेशमूर्ती कामात स्वतः ला गुंतवून आहे. त्यामुळेच जवळ-जवळ 60 टक्के मूर्तीकाम पूर्ण झाले आहे. जशा मूर्ती बनवून-रंगवून पूर्ण होत आहेत, तशा त्या नेण्यासाठी जिह्यासह सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व महाराष्ट्रातील इतर जिल्हय़ातील शेकडो विक्रेते कुंभार गल्ल्यांमध्ये टेम्पो, ट्रकसह दाखल होत आहेत. मे महिन्यांपासून आजतागायत तर शहरातील कुंभार गल्ल्यांमधून तब्बल दोन ते अडीच लाख लहान-मोठय़ा गणेशमूर्ती आपापल्या गावी नेल्या असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात आले. 

   श्रावणाच्या समाप्तीनंतर म्हणजेच 2 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मूर्तीकारांनी गतवर्षीच्या दसऱयापासून तर काहींनी मे महिन्यातील अक्षय तृतियापासून मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून अर्ध्यापासून 14 फुट ऊंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती बनविल्या जात आहे. यामध्ये सिंहासनारुढ व बैठी या पारंपरिकसह विविध रुपांमधील आकर्षक गणेशमूर्तींचा समावेश आहे. गेल्या पंधरांपासून मंडळांचे कार्यकर्ते तसेच घरगुती भक्त देखील गणेशमूर्तींची ऑर्डर देण्यासाठी कुंभार गल्ल्यांमध्ये दाखल होत आहे.   प्लास्टरऐवजी शाडूच्या मूतांना प्राधान्य दिले जात आहे.

   शहरातील पाचही कुंभारगल्ल्यांमधील चारशे ते पाचशे मूर्तीकार विविध रुपातील गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत. मूर्ती विविध रंगांनी रंगविण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या गन मशिनचा वापर केला जात आहे. गोवा व कर्नाटकातील प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तीवरील बंदीवर पर्याय म्हणून मूर्तीकारांकडून यंदाही प्लास्टर व कोण्णूर शाडू मिक्स करुन गणेशमूर्ती बनविल्या जात आहे. अशा पद्धतीने बनविल्या गेलेल्या शेकडो मूर्तींना गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरात येथून ऑर्डरी आल्या आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत तर सांगली, सातारा सीमाभागातील काही मूर्तीकारांनी एक हजारांच्या आसपास कच्च्या गणेशमूर्ती आपापल्या गावी नेल्या आहेत. सध्याही अनेक विक्रेते गणेशमूर्ती नेण्यासाठी बापट पॅम्पमध्ये वाहनांसह दाखल होत आहेत.    

-कोल्हापुरातील मूर्तीकारांची चौथी पिढी गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात.

öरोज अडीच-तीन हजारांवर बनविल्या जातात गणेशमूर्ती.

-पाणी प्रदुषणाचा विचार करुन मूर्तीकारांकडून जलरंगांचा वापर.

-प्लास्टर ऑफ पॅरीसपासून गणेशमूर्ती बनविणारे शहरात साडे तीनशेवर मूर्तीकार.

-शाडूपासून गणेशमूर्ती घडविणारे फक्त 40 ते 50 मूर्तीकार.

öगणेशमूर्तीचे डोळे रेखणारे तीनशेवर कलाकार कोल्हापूरात.

-मोठय़घ् गणेशमूर्तींचे डोळे रेखणारे पन्नासावर कलाकार.

-एका लहान गणेशमूर्तीचे डोळे रेखण्यासाठी दहा रुपये तर पाच फुटापर्यंतच्या गणेशमूर्तीच्या डोळे रेखणासाठी दीडशे रुपये कलाकार घेतात. –

——–

कोल्हापूरचा राजा 29 जुलैला येणार…

कोल्हापूरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱया रंकाळावेस गोल सर्कल मित्र मंडळाच्या वतीने देखण्या गणेशमूर्ती 29 जुलै रोजी चिंचपोकळीहून (मुंबई) कोल्हापूरात आगमन होणार आहे. मूर्ती आणण्यासाठी मंडळाचे शेकडो कार्यकर्ते ट्रकासह 27 जुलैला चिंचपोकळीकडे रवाना होणार आहे.

Related posts: