|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यानी आता ठोस कारवाई करावी !

मुख्यमंत्र्यानी आता ठोस कारवाई करावी ! 

आंदोलनकर्त्या दूध उत्पादकांची मागणी

प्रतिनिधी/ फोंडा

गोवा डेअरीमध्ये चाललेला भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेतल्याबद्दल दूध उत्पादकांनी अभिनंदन केले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डेअरीचे हंगामी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत यांना 31 जुलैपर्यंत पदावरून हटवावे व या भ्रष्टाचारा विरोधात सखोल चौकशी अशी मागणीही करण्यात आली आहे.

गोवा डेअरीमधील या भ्रष्टाचाराविरोधात व शेतकऱयांच्या इतर मागण्यांसाठी हल्लीच गोवा डेअरीसमोर आमरण उपोषणाला बसलेले माजी अध्यक्ष व दूधउत्पादक अनुप देसाई व संजीव कुंकळय़ेकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत दूध उत्पादक विकास प्रभू हे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात गोवा डेअरीमधील भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. भ्रष्टाचारामुळेच डेअरी घाटय़ात गेली असून व्यवस्थापकी संचालक या जबाबदारीच्या पदाचा ताबा  डेअरीमधील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱयाकडे द्यावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून गोवा डेअरीच्या कारभारावरील शेतकऱयांचा विश्वास उडालेला आहे हे स्पष्ट होत आहे.

गोवा डेअरीमध्ये सरकारमधील एखाद्या प्रतिनिधीची नियुक्ती करावी या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला अनुप देसाई यांनी आक्षेप घेतला असून संचालक मंडळामध्ये सरकारच्या एका अधिकाऱयाची नियुक्ती केली असताना वेगळय़ा सरकारी प्रतिनिधीची आवश्यकता नाही. गोवा डेअरी तोटय़ात जाण्यामागे तेथील भ्रष्ट यंत्रणा व अधिकारी कारणीभूत असून डेअरीला या भ्रष्टाचारातून मुक्त केल्यास डेअरी निश्चितच नफ्यात येईल असे त्यांनी सांगितले.

गाईच्या दुधावर शेतकऱयांना रु. 5 या प्रमाणे दरवाढ मिळावी ही मागणी पूर्ण होणे शक्य नाही असे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सावंत यांचे म्हणणे आहे.  सध्या संचालक मंडळावर सरकारची मर्जी असून शेतकऱयांना मिळणाऱया आधारभूत किंमतीमध्ये वाढ केल्यास दूधावर दरवाढ देणे शक्य आहे. तसेच डेअरी तोटय़ात जाण्यासाठी जो भ्रष्टाचार झाला, त्यात सहभागी असलेल्या दोषींकडून तोटय़ाची रक्कम वसूल करून घ्यावी, अशी मागणी विकास प्रभू यांनी केली. 31 जुलैपर्यंत हंगमी एम. डी. हटवून नवीन एम. डी नियुक्त न झाल्यास शेतकऱयांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील कृती ठरविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

Related posts: