|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आझम खान यांचा अखेर माफीनामा

आझम खान यांचा अखेर माफीनामा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी अखेर खासदार रमा देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत सोमवारी लोकसभेत माफी मागितली. त्यांनी माफी मागावी अशी मागणी सर्वच पक्षांच्या महिला सदस्यांनी केली होती. माफीस नकार दिल्यास त्यांना निलंबित केले जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

  मागील आठवडय़ात लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू होती. यावेळी रमा देवी पीठासीन अधिकारी होत्या. त्यांना उद्देशून आझम खान यांनी म्हटले होते की, ‘तुम्ही मला खूप आवडता. तुमच्या डोळय़ात डोळे घालून पाहतच राहावे असेच वाटतं’. याचवेळी रमा देवी यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच ‘तुम्हाला सभागृहात बोलण्याचीही शिस्त नाही’ असेही सुनावले होते. तुम्ही माझ्या बहिणीप्रमाणे आहात असा खुलासा करत आझा यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. सर्वपक्षीय महिला खासदारांनी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. माफी मागण्यास नकार दिल्यास त्यांना निलंबित करावे, असे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले होते. सोमवारी लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर त्यांनी आपला माफीनामा सादर केला. ते म्हणाले, ‘माझे विधान कोणाचाही भावना दुखावण्याचा नव्हत्या. मी दोनवेळा संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच चारवेळा मंत्री, नऊवेळा खासदार तसेच राज्यसभा सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. माझी भाषणे, वर्तन याबाबत संपूर्ण सभागृहाला माहिती आहे. माझे विधान चुकीचे असल्याचे वाटत असल्यास त्याबद्दल मी माफी मागतो, असे ते म्हणाले. त्यांनी माफी मागितल्याचे स्पष्ट झाले नसल्याचे संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आझम खान यांनी पुन्हा एकदा माफी मागितली.

आझम खान यांचे वर्तन असभ्यच : रमा देवी

आझम खान यांनी अशा प्रकारची विधाने यापूर्वीही केली आहेत. तिहेरी तलाक बंदी विधेयकावरील चर्चेवेळी त्यांनी केलेल्या विधानांमुळे संपूर्ण देश व्यथित झाला आहे. त्यांचे वर्तनच असभ्य आहे, अशा शब्दात भाजप खासदार रमा देवी यांनी आझम यांचा निषेध केला. मनात येईल ते तुम्ही बोलू शकत नाही. आपले वर्तन सुधारावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी अखिलेश यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करणाऱया अखिलेश यादव यांनाही त्यांनी फटकारले.

Related posts: