|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी सिव्हील रूग्णांनी ‘फुल्ल’

रत्नागिरी सिव्हील रूग्णांनी ‘फुल्ल’ 

पावसामुळे साथींच्या आजारांमध्ये वाढ

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ात सुरू असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून सर्दी, ताप आणि जुलाबाच्या रूग्णांनी जिल्हा शासकीय रूग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे.   276 रूग्ण उपचार घेत असलेल्या या रूग्णालयात मंगळवारी आणखी 68 रूग्ण उपचारासाठी आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. रूग्णांना उपचारासाठी कॉटच शिल्लक नसल्याने त्यांना दाखल कसे करून घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, रूग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी जमिनीवर गाद्या टाकून उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  जिल्हा रूग्णालयात सध्या 200 रूग्ण क्षमता आहे. मात्र मंगळवारी तब्बल 344 रूग्ण उपचार घेत आहेत.जिल्हा रूग्णालयात स्त्राr-पुरूष विभागासह बालविभाग, अतिदक्षता, अपघात, जनरल आदी विभाग आहेत. हे सगळे विभाग रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. ज्या रूग्णांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे, त्यांना डिस्चार्ज देवून नवीन रूग्ण दाखल करून घेतले जात आहेत. साथीच्या आजारांमध्ये ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या अधिक असून जमिनीवर झोपून उपचार घेण्यास तयार असल्याचे रूग्ण सांगत असल्याने रूग्णालयाकडून जमिनीवर गाद्या टाकून देण्यात आल्या आहेत.

 ‘टीबी वॉर्ड’ची पोस्ट चुकीची

 रूग्णालयात जागा नसल्याने रूग्णांना टीबी वॉर्डमध्ये स्थलांतर करण्यात आल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता ही पोस्ट चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुळात टीबी पेशंटचाच संख्या अधिक असल्याने हा वॉर्ड फुल्ल आहे. त्यामुळे त्या वॉर्डमध्ये सर्दी-तापाच्या पेशंटना दाखल करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

अनेक पदे रिक्त 

मुळात रूग्णालयात फिजिशियन हे पद गेले वर्षभर रिक्त असून डॉ. चेतन औरंगाबादकर यांच्या मदतीने अत्यावश्यक रूग्ण तपासले जात आहेत. डॉ. औरंगाबादकर यांच्या सहकार्यामुळेच अतिदक्षता विभागही सुरळीत सुरू आहे. अनेक पदे रिक्त असताना जिल्हा रूग्णालयाची तारेवरची कसरत होत आहे. तरीही रूग्णांना उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रूग्णांच्या नातेवाईकांनीही वैद्यकीय अधिकाऱयांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

 

नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

 जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयालगत रूग्णालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र याचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी त्याचे उद्घाटन झालेले नाही. ही इमारत वापरली गेली तर जागेचा प्रश्न निर्माण झाला नसता. केवळ शासकीय अनास्थेमुळे रूग्णांसाठी खोल्या तयार असूनही सध्या त्यांना  जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहेत.

 

Related posts: