|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अरगन तलावाशेजारील वळणे ठरताहेत धोकादायक

अरगन तलावाशेजारील वळणे ठरताहेत धोकादायक 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून विशेषत: अरगन तलाव चौक ते गणपती मंदिरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. एखादे अवजड वाहन किंवा बस या परिसरामधून जात असल्यास वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघात घडत आहेत. यामुळे अरगन तलाव ते गणपती मंदिरपर्यंतचा रस्त्यावरील वळणे हटवून सरळ करण्याची मागणी होत आहे.

बेळगाव-वेंगुर्ला हा रस्ता राज्यमार्ग असून महाराष्ट्र व गोव्याला जाण्यासाठी सोयीचा आहे. यामुळे रस्त्याला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. दररोज पन्नासहून  अधिक ट्रक भाजी घेऊन गोव्याला जात असतात. सध्या हा रस्ता खुपच वर्दळीचा बनला आहे. हजारो वाहने रस्त्यावरून ये-जा करीत असतात. पण हा रस्ता काही ठिकाणी अडचणीचा बनला असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनला आहे.  गणपती मंदिर परिसरात अरगन तलावशेजारी अनेक वळणे असल्याने वाहनांचे अपघात होत असतात.

गणपती मंदिर ते अरगन तलाव चौकापर्यत रस्ता अरूंद असून बेळगावकडे जाताना चढण लागते. या परिसरामधून एखादे अवजड वाहन किंवा परिवहन मंडळाची बस जात असल्यास अन्य वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसतो. तसेच वळणे असल्याने ओव्हरटेक करणे धोकादायक आहे. काहीवेळा दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक जीव धोक्मयात घालून ओव्हरटेक करताना दिसतात. अशामुळे अपघात घडत आहेत.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे वळणे हटवून रस्ता सरळ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण सदर जागा मिलीटरीची असल्याने परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामुळे रस्ता रूंदीकरण आणि वळणे हटविण्याचा प्रस्ताव मिलीटरी प्रशासनाकडे 2012 मध्ये देण्यात आला होता. पण त्यावेळेच्या मिलीटरी प्रशासनाच्या अधिकाऱयांनी परवानगी नाकारली होती. यामुळे रस्ता सरळ करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. पण अलिकडे मिलीटरी प्रशासनाने संरक्षक भिंत घालण्याचे काम हाती घेतले असल्याने रस्त्यावरील वळणे हटविण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी आणि मिलीटरी प्रशासनाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे. रस्त्याचा प्रस्तावाबाबत सार्वजनिक बांधकाम खाते आणि मिलीटरी अधिकाऱयांनी चर्चा करावी. रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेऊन याठिकाणी होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.