|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नद्या इशारा पातळीकडे, सर्तक रहा

नद्या इशारा पातळीकडे, सर्तक रहा 

प्रतिनिधी, वार्ताहर/   चिकोडी, कुडची

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून तालुक्यातील आठ पैकी सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दोन बंधारे वाहतुकीस खुले आहेत. तसेच कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने कुडची-उगारखुर्द पूलही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नदी काठावर महापुराचे सावट गडद झाले आहे. खबरदारी म्हणून कर्नाटकातील आलमट्टी जलाशयातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रशासनही सज्ज आहे.

कृष्णा नदीची अंकली येथील पाणीपातळी 533.31 मीटर, सदलगा येथे वेदगंगा-दूधगंगेची पाणीपातळी 535.27 तर हिप्परगी येथे कृष्णेची पातळी 522.80 मीटर इतकी झाली आहे. राजापूर धरणातून 1 लाख 49 हजार 625 क्युसेक्स विसर्ग होत आहे. हिप्परगी धरणात 121500 क्युसेक तर आलमट्टी जलाशयात 119850 क्युसेक पाणी येत आहे.

आलमट्टी जलाशयातून 1 लाख 75 हजार 563 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 26 जुलैपासून संततधार सुरू असल्याने बुधवारी सकाळी 8 वाजता कोयना जलाशयाची पातळी 2 हजार 135 फुट 5 इंच असून जलाशयामध्ये 74.89 टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास जलाशयातून सुमारे 2 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.

 

सदलगा-घोसरवाड बंधाऱयावर पाणी

सदलगा : सदलगा दूधगंगा नदीच्या पातळीत 6 फुटांनी वाढ झाली आहे. तसेच सदलगा परिसरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. सदलगा-घोसरवाड दरम्यानच्या बंधाऱयावर पाणी आल्याने पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरू आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसात होत आहे. नदीकाठची मोटारी सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱयांची धावपळ सुरू आहे.

कुडची पुलावर पोलीस बंदोबस्त

कुडची पुलावर बुधवारी पहाटे पाणी आल्याने पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुडचीचे पीएसआय जी. एस. उप्पार यांनी पुलाला भेट देऊन सूचना दिल्या. तसेच वाढत्या पातळीने कृष्णा काठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अन्य मार्गाने वाहतूक सुरू

कुडची पुलावरील वाहतूक बंद झाल्याने जमखंडी-सांगली राज्य मार्गावरील जमखंडीहून येणारी वाहतूक हारुगेरी क्रॉस-दरूर-अथणी मार्गाने वळविण्यात आली आहे. जमखंडी, रबकवी, बनहट्टी, महालिंगपूर, तेरदाळ, हारुगेरी येथील नागरिक कुडचीपर्यंत येऊन येथून मिरज, सांगली, कोल्हापूरकडे जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेत आहेत. त्यामुळे कुडची रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे. जमखंडीसह अन्य आगारातर्फे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बसची सोय केल्याने नागरिकांना सोयीस्कर झाले आहे.

Related posts: