|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अरुंद नाल्यामुळे मराठा कॉलनीत पाण्याची तळी

अरुंद नाल्यामुळे मराठा कॉलनीत पाण्याची तळी 

प्रतिनिधी/  बेळगाव

सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात पाणीच पाणी झाले. वास्तविक पाहता बसवेश्वर उड्डाणपुलाखालील नाल्याची रुंदी कमी झाल्याने मराठा कॉलनी परिसरात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. समर्थनगर परिसरातील नाल्यात कचरा साचून पाण्याचा प्रवाह अडल्याने येथील रस्ता वाहून गेला. यामुळेच समर्थनगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

 काही ठिकाणी नाल्यांच्या काठावरील घरात पाणी शिरण्याचे प्रकारही घडले. पाहणीदौरे करून अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना सतर्क राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. पण ही परिस्थिती निर्माण होण्यास कारण काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न मनपाने केला नाही. वास्तविक पाहता 2016 मध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र नाल्यांचे बांधकाम झाल्याने मागील दोन वर्षात नाल्यांतील पुराच्या पाण्याचा फटका बसला नव्हता. मात्र यंदा पुन्हा मराठा कॉलनी व टिळकवाडी परिसरातील चौगुलेवाडी, शांती कॉलनी, गजानन महाराजनगर अशा विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

नाला दीड फुटाने झाला अरुंद

 गोगटे चौक ते मराठा मंदिरपर्यंतच्या बसवेश्वर उड्डाणपुलाखालून वाहणाऱया नाल्याची रुंदी कमी झाली आहे. उड्डाणपुलाची उभारणी करताना नाल्याचे बांधकाम करणे आवश्यक होते. पण अस्तित्वात असलेल्या नाल्याची डागडुजी करून वेळ मारून नेण्याचा प्रकार कंत्राटदारांनी केला असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे हा नाला दीड फुटाने अरुंद झाला आहे. या पुलाखाली पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी कचरा साचला आहे. यामुळेच टिळकवाडीतील रहिवाशांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले.

समर्थनगर परिसरात रस्ता वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. पावसामुळे समर्थनगर परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले. कपिलेश्वर कॉलनीमधील रस्ते पाण्याखाली गेले. ही परिस्थिती का निर्माण झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, समर्थनगर परिसरातून वाहणाऱया लेंडी नाल्यामधील कचरा काही झाडांमुळे अडकून राहिला होता. परिणामी पाण्याचा प्रवाह रोखला गेल्याने रस्त्यावरून पाणी वाहून समर्थनगरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हा रस्तादेखील वाहून गेला आहे. यामुळे या समस्या सोडविण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याची गरज आहे. समर्थनगर येथील नाल्याशेजारी असलेल्या रस्त्याची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

Related posts: