|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावात आजपासून महिला पोलीस भरती

बेळगावात आजपासून महिला पोलीस भरती 

मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे भरती प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण

प्रतिनिधी/ बेळगाव

देशात प्रथमच लष्करामध्ये महिलांना पोलीस म्हणून भरती करून घेण्यात येणार आहे. दि. 1 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री येथे ही भरती प्रक्रिया चालणार आहे. या प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली असून सेनेच्या आवाहनाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती डेप्युटी डायरेक्टर जनरल ब्रिगेडिअर दिपेंद्र रावत यांनी पत्रकारांना दिली.

मिलिटरी महिला पोलीस भरतीसंदर्भात बुधवारी इन्फंट्रीच्या शिवाजी क्रीडांगणावर बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत रावत म्हणाले, बेळगावमध्ये होणारी भरती कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच अंदमान, माहे व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांसाठी मर्यादित आहे. महिलांनी सेनेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 15 हजारांहून अधिक अर्ज आले. मात्र त्यातून 3 हजार जणांची पुढील चाचणीसाठी निवड केली आहे.

ठराविक अंतर धावणे, त्यानंतर उंच उडी व लांब उडी ही शारीरिक चाचणी होईल. या शिवाय उंची, वजन पाहिले जाईल. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी केली जाईल. यासाठी मुलींचा वयोगट साडे सतरा ते एकवीस आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 100 जणींना महिला पोलीस म्हणून भरती करून घेतले जाईल. परराज्यातून येणाऱया या उमेदवार महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आपण सर्व ती तयारी केली आहे आणि योग्य ती खबरदारीही घेतली आहे. भरती प्रक्रियेच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत, असेही रावत म्हणाले.

या भरती प्रक्रियेसाठी प्रशासन व पोलीस खात्याने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवार महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेस्टेशनवर खास कक्ष उभारला आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि नि:पक्षपाती राहील, अशी ग्वाहीसुद्धा रावत यांनी दिली. 

उमेदवार महिलांची होणारी गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पोलीस गर्दी नियंत्रित करण्यासाठी तैनात केले आहेत. या शिवाय महिला पोलिसांचीही नियुक्ती केली आहे. रुग्णवाहिका व तज्ञ डॉक्टरही उपलब्ध असणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. 

Related posts: